कुळगाव-बदलापूर पालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विविध प्रकल्पांसाठी विशेष तरतूद करण्याबरोबरच पालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यावरही भर देण्यात आला आहे. शहराची ओळख ‘वायफाय सिटी’ अशी व्हावी, यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. त्यामुळे सध्याच्या नगरसेवकांच्या कारकीर्दीतील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. एकंदरीत मतदारांचा बदलता कल लक्षात घेता शहरात विकासकामे सुरू आहेत आणि ती पूर्ण व्हावीत, यासाठी पुन्हा आपल्यालाच निवडून द्यावे, अशी साद मतदारांना घालता येईल, या दृष्टीने ही विकासकामे आणि प्रकल्प राबविण्यावर  शिवसेना-भाजप युतीचा प्रयत्न असल्याचे यंदाच्या अर्थसंकल्पावरून दिसत आहे.
*  प्रमुख १० रस्त्यांचे काँक्रिटीकरण
नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरातील १० प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यात बाजारपेठ रस्ता, रेल्वे स्थानक ते गांधीचौक (पूर्व), रेल्वे स्थानक ते कात्रप, रेल्वे स्थानक ते तलाव (पश्चिम), उल्हास नदीचा रस्ता, वैशाली टॉकीज ते वालीवली गाव, गांधी टेकडी ते हेंद्रेपाडा आदी रस्त्यांचा यात समावेश आहे. यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पांचा ८० टक्के खर्च नगरोत्थान योजनेअंतर्गत करण्यात येणार असून २० टक्के पालिका खर्च करणार आहे.
* उड्डाण पूल, पादचारी पूल
बाजारपेठेतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रभावी उपाय म्हणून पश्चिमेकडील साईकृपा रुग्णालय ते सानेवाडी (बाजारपेठ) उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. बॅरेज रोड ते खरवई रेल्वे उड्डाण आणि बॅरेज रोड ते गावदेवी असा पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.
* डिजिटल ग्रंथालय
शहराच्या पश्चिमेला रेल्वे स्थानकासमोर असलेल्या इमारतीत चार हजार चौरस फूट जागेत डिजिटल ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासकीय सेवेसाठी लागणारे साहित्य विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा शहरातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.
* बोटॅनिकल गार्डन
शहरात वेगाने विकसित होत असलेला भाग म्हणजे कात्रप परिसर. या ठिकाणी ५० एकर जागेत बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात येणार आहे. तर खरवई येथे सायन्स सेंटर आणि वालीवली येथे २० एकर जागेत थीम पार्क उभारण्यात येणार आहे.
* उल्हास नदीचे संवर्धन
शहरातून बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीच्या संवर्धनासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. शहरातील सांडपाणी नदीत मिसळू नये यासाठी जल, मलनि:सारण शुद्धीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. नदी तीरावर हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे. येथील चौपाटीचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
* शॉपिंग सेंटर
पालिकेच्या उत्पन्नात वाढ व्हावी, तसेच नवीन स्रोत निर्माण व्हावे यासाठी खरवई आणि म्हाडा कॉलनीत शॉपिंग सेंटर उभारण्यात येणार आहे.
* मच्छी मार्केट
शहराच्या पूर्व आणि पश्चिमेकडे मच्छी मार्केट उभारण्यात आले आहे. राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळाच्या आर्थिक सहकार्यातून कुळगाव पूर्व येथे आणि बदलापूर गाव येथे मार्केट बांधण्यात आले असून त्याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.