करमाळा कृषी बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून बाजार समितीच्या १९ संचालकांच्या जागांपैकी पणन मतदारसंघाची एक जागा वगळता उर्वरित १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या बाजार समितीवर काँग्रेसचे माजी आमदार जयवंत जगताप गटाची अबाधित सत्ता आहे.
या निवडणुकीत जगताप गटाचा पाडाव करण्यासाठी त्यांच्या कट्टर विरोधक असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदार श्यामल बागल गटाने जोरदार व्यूहरचना केली आहे. बाजार समितीवरील जगताप गटाची एकहाती सत्ता हिरावून घेण्यासाठी आतापर्यंत बागल गटाने पुरेपूर प्रयत्न केले. परंतु ते निष्पळ ठरले आहेत. या पाश्र्वभूमीवर बागल गटाने जगताप गटाला शह देण्यासाठी कंबर कसली असताना करमाळा तालुक्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका वठविणारे जेऊरचे नारायण पाटील यांच्या गटाची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाही. पाटील गट कधी जगताप गटाशी तर कधी बागल गटाशी मैत्री करतो. यापूर्वी एकदा याच बाजार समितीच्या निवडणुकीत जगताप यांच्या विरोधात पाटील गटाने ताकद पणाला लावली होती. त्यावेळी शांततेला गालबोट लागून त्यात पाटील गटाने जगताप यांच्यावर थेट प्राणघातक हल्ला केला होता. परंतु राजकारणात बदलत्या समीकरणानुसार जगताप व पाटील पुन्हा एकत्र आले होते. काही महिन्यांपूर्वी पाटील गटाने बागल गटाला साथ देण्याचे धोरण आखले होते. परंतु अलीकडे पाटील गट पुन्हा तटस्थ राहात ‘थांबा, पाहा व पुढे चला’ ची भूमिका स्वीकारल्याचे दिसून येते. या पाश्र्वभूमीवर करमाळा तालुक्यातील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यात पाटील गट कोणाबरोबर राहणार, यावर पुढील भवितव्य अवलंबून आहे. त्याकडे संपूर्ण तालुका वासियांचे लक्ष वेधून घेतले आहे.