पंढरपूर तालुक्यातील नेमतवाडी येथे मीनाक्षी अमराळे हिचा रॉकेलने जाळून खून केल्याप्रकरणी पंढरपूरच्या सत्र न्यायालयाकडून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पतीसह तिघा आरोपींचे मुंबई उच्च न्यायालयाने अपील मंजूर करून त्यांना जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
मीनाक्षी अमराळे या नवविवाहितेचा जाळून खून केल्याबद्दल पती साधू अमराळे, सासरा रमेश अमराळे व सासू पार्वती अमराळे (रा. नेमतवाडी) या तिघांना पंढरपूरचे सत्र न्यायाधीश आर. बी. पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाविरूध्द तिन्ही आरोपींनी अॅड. जयदीप माने यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर न्या. व्ही. के. तेहेलरामानी व न्या. पी. डी. कोदे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. मृत मीनाक्षी हिचा विवाह तिच्या इच्छेविरूध्द झाला होता. त्यामुळे ती सतत माहेरीच राहत होती. घटनेच्या दिवशी, १० जानेवारी २०११ रोजी तिने स्वत:हून रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेतले होते. त्यानंतर २६ तासांच्या विलंबाने तिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणे धोक्याचे असल्याचा युक्तिवाद अॅड. माने यांनी केला. सरकारतर्फे अॅड. शिल्पा गाजरे-धुमाळ यांनी काम पाहिले.