सन २००८ मध्ये केलेल्या वादग्रस्त विधानाच्या आरोपासंदर्भात मनसेचे नेते राज ठाकरे शुक्रवारी वाळवा येथील न्यायालयात उपस्थित राहिले. १५ हजार रुपयांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आला. या खटल्यातील अन्य सात आरोपींना यापूर्वी जामीन मंजूर झाला आहे.    
कल्याण येथे सन २००८ मध्ये झालेल्या सभेवेळी राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. त्या वेळी त्यांना अटक झाली होती. त्याचे पडसाद राज्यात उमटले होते. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती. याप्रकरणी कोकरूड पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे, आमदार शिरीष पारकर, मनसेचे उपजिल्हाप्रमुख तानाजी चव्हाण यांच्यासह आठ जणांवर सरकारी कामात अडथळा, सार्वजनिक ठिकाणी तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी शिराळा येथील न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. तानाजी चव्हाण यांच्यासह अन्य सहाजणांना जामीन मंजूर करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी गुरुवारी राज ठाकरे हे शिराळा येथे आले होते. हेलिकॉप्टरने त्यांचे शिराळा बायपास येथे आगमन झाले. राज ठाकरे, आमदार नितीन देसाई, आमदार शिशिर शिंदे, आदित्य शिरोडकर आदी त्यांच्या समवेत होते. ठाकरे हे न्यायालयीन कामकाजासाठी शिराळा येथे आले असले तरी सांगली जिल्हय़ातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच राजप्रेमी नागरिकांनी ते जाणार असलेल्या मार्गावर गर्दी केली होती. ठाकरे यांचा दौरा लक्षात घेऊन मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवासाच्या मार्गावर राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक, पक्षाचे ध्वज व कमानी लावण्यात आल्या होत्या.     
खटल्याच्या कामकाजासाठी राज ठाकरे न्यायालयात सुमारे पंधरा मिनिटे उभे होते. त्यांचे वकील मनसेचे सरचिटणीस अ‍ॅड. जयप्रकाश बाविसकर, राजेंद्र शिरोळकर, सय्याजी नांगरे आदींनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायमूर्ती की. प. माने यांनी पंधरा हजाराचा वैयक्तिक जामीन त्यांना मंजूर केला. न्यायालयीन कामकाज संपल्यानंतर वाळवा तालुका बार असोसिएशनच्या वतीने ठाकरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.    त्यानंतर ते नागमणी शासकीय विश्रामगृहात पोहोचले. माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी चर्चा करण्याचे प्रारंभी मान्य केले होते, मात्र चहापान आवरून ते तेथून माध्यमांशी न बोलता निघून गेले. पुढील आठवडय़ात कोल्हापूर येथे मनसेचा मेळावा होणार असून, त्या वेळी ते भूमिका स्पष्ट करतील, असे स्थानिक नेत्यांनी सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वेळी माजी आमदार नितीन शिंदे, माजी जिल्हाप्रमुख सुधाकर खाडे, चंद्रकांत खराडे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी सावंत, महिला आघाडीप्रमुख स्वाती शिंदे यांच्यासह जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.