जगाला त्याग व बलिदानाची शिकवण देणारा ‘ईद-ऊल-अजहा’ सण सोलापूर शहर व परिसरात बुधवारी शांततेत व मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी सर्व प्रमुख ईदगाह मैदानांवर व मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज पठण करून प्रार्थना केली. नातेवाईक व मित्रपरिवारासह एकमेकांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या.
इस्लाम धर्माच्या इतिहासात हजरत इब्राहिम व त्यांचे पुत्र हजरत इस्माईल यांच्यावर त्याग व बलिदानाची परीक्षा देण्याचा प्रसंग आला होता. अल्लाहच्या आदेश व भक्तिपोटी हजरत इब्राहिम यांनी आपल्या पुत्राची आहुती देण्याची सिद्धता ठेवली होती. या घटनेचे स्मरण म्हणून ‘ईद-ऊल-अजहा’ साजरी करण्याची परंपरा आहे. त्याग व बलिदानाचे प्रतीक म्हणून बोकड, मेंढय़ांची कत्तल केली जाते. शहरात ईदसाठी ठिकठिकाणी जनावरांचा बाजार भरला होता. बोकड व मेंढय़ांच्या किमती यंदा २० टक्क्यांनी वाढल्या होत्या. बोकडाची किंमत २० ते २५ हजारापर्यंत होती. राजस्थानातून आलेल्या ‘अजमेरी’ बोकडाचे आकर्षण सोलापूरकरांना होते. या अजमेरी बोकडाचा दर तब्बल दीड लाखापर्यंत होता.
ईदनिमित्त सकाळी सर्व प्रमुख ईदगाह मैदानांवर सामूहिक नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र आले होते. परंतु पहाटे पावसाच्या दमदार सरी कोसळल्याने ईदगाह मैदानावर मोठय़ा प्रमाणात चिखल झाला होता. त्यामुळे गैरसोय सहन करीत नमाज पठण करण्यात आली. होटगी रस्त्यावरील नवीन आलमगीर ईदगाह, सिद्धेश्वर पेठेत पानगल प्रशालेच्या मैदानावरील आलमगीर ईदगाह, जुनी मिल पटांगणातील आदिलशाही ईदगाह, आसार मैदान ईदगाह व शिवछत्रपती रंगभवनाजवळील अहले-हदीस ईदगाह या पाच प्रमुख ईदगाहावर मुस्लिम बांधव मोठय़ा संख्येने एकत्र आले होते. परंतु पावसाच्या चिखलामुळे यापकी अहले-हदीस ईदगाह येथील नमाज पठणाचा विधी स्थगित करून तो पानगल प्रशालेच्या मदानावर पार पाडण्यात आला. याशिवाय सर्व मशिदींमध्ये नमाजासाठी गर्दी उसळली होती.