सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन सानेगुरूजी कथामालेतर्फे शालेय विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून वाचन व वक्तृत्वाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिने विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात येत असून याअंतर्गत वक्तृत्व स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
सकाळी साडेनऊ वाजता वाचनालयाच्या परशुराम साईखेडकर नाटय़मंदिरात ही स्पर्धा होणार आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन सार्वजनिक वाचनालयातर्फे केले आहे. गट क्रमांक एक मध्ये इयत्ता तीसरी ते चौथीसाठी साने गुरूजींच्या जीवनातील एक प्रसंग, मी वाचलेले पुस्तक, माझे शिक्षक, माझी मराठी मायबोली तर, गट क्रमांक दोनमध्ये इयत्ता पाचवी ते सहावीसाठी भारतरत्न सचिन, माझ्या आवडत्या लेखिका, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, होय मी शिकणार आहे हे विषय ठेवण्यात आले आहेत. गट क्रमांक तीनमध्ये इयत्ता सातवी ते आठवीसाठी सिंहस्थ कुंभमेळा, युगपुरूष नेल्सन मंडेला, होय मी मुलगी आहे, इंदिरा संतांची कविता हे विषय आहेत. स्पर्धेसाठी प्रत्येकी तीन मिनिटे वेळ आहे. कथन कौशल्य, विषयातील मुद्दे, शब्दोच्चार, सभाधीटपणा, एकूण परिणाम यांचा विचार गुण देण्यासाठी केला जाणार आहे. स्पर्धकांनी सार्वजनिक वाचनालयात नाव नोंदणी करावी.