‘बालक पालक’ हा चित्रपट पुढील आठवडय़ात चार राज्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. दरम्यान, आता इंग्रजी शाळांमध्येही हा चित्रपट दाखविण्याची शिफारस करण्यात आली आहे. पहिल्या सोळा दिवसांत या चित्रपटाने पावणे पाच कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.
शालेय जीवनातील विद्यार्थी आणि लैंगिक शिक्षण हा विषय घेऊन तयार केलेला ‘बालक पालक’ चित्रपट सध्या गाजत आहे. तिसऱ्या आठवडय़ातही हा चित्रपट महाराष्ट्रातील २३३ चित्रपटगृहांमध्ये सुरू असून पहिल्या १६ दिवसांत त्याने पावणेपाच कोटी रुपयांचा गल्ला जमविल्याची माहिती निर्माते उत्तुंग ठाकूर यांनी दिली.
या यशामुळे २५ जानेवारीपासून हा चित्रपट सुरत, बडोदा, जयपूर, इंदोर आणि दिल्ली या शहरात प्रदर्शित करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरातील शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी बुधवारी विशेष खेळाचे आयोजन करण्यात आले असून अडीचशेहून अधिक मुख्याध्यापक आणि शिक्षक हा खेळ पाहणार आहेत. तर इंग्रजी आणि इंटरनॅशनल स्कूलमध्येही या चित्रपटाचे प्रदर्शन करण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ‘भारतमाता’ चित्रपटगृहात या चित्रपटाच्या तिकिटावरून झालेल्या वादातून हत्या झालेल्या अजय खामकर या तरुणाच्या कुटुंबीयांना २ लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. निर्माते उत्तुंग ठाकूर यांनी सातारा येथे जाऊन अजयच्या कुटुंबीयांना ही मदत दिली.