समतोल लिखाण हा डॉ. म. बा. कुलकर्णी सरांच्या यांच्या लिखाणाचा गाभा होता. त्यामुळेच मूळ रामायणाच्या आधारे प्रभू रामचंद्रांचे जीवनदर्शन घडविणारा ‘नव्याने रामकथा गाऊ’ हा संशोधनपर ग्रंथ लोकांच्या पचनी पडला..
संस्कृत व मराठी विषयाचे गाढे अभ्यासक व समीक्षक प्रा. डॉ. म. बा. कुलकर्णी यांच्या निधनानंतर त्यांच्या विषयीच्या आठवणींना उजाळा देताना प्रा. गिरीश पिंपळे यांनी सरांच्या लिखाणाचे काही पैलू मांडले आहेत. कारकिर्दीची सुरूवात पत्रकार म्हणून करणाऱ्या डॉ. कुलकर्णी यांनी माध्यमिक शिक्षक म्हणूनही काही काळ काम केले. रत्नागिरीच्या जोगळेकर-गोगटे महाविद्यालयात सुमारे दहा वर्ष संस्कृत शिकविल्यानंतर ते नाशिकमध्ये गोखले एज्युकेशन सोसायटीत रुजू झाले. या संस्थेच्या बिटको (नाशिकरोड) आणि एचपीटी महाविद्यालयांमध्ये त्यांनी एकवीस वर्ष संस्कृत आणि मराठी हे विषय शिकवले. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी मराठी विषयात पदव्युत्तर पदवी मिळविताना पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात पीएच. डी.चे मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केल्याचे प्रा. पिंपळे यांनी नमूद केले आहे.
रामायण आणि महाभारत हे सरांचे विशेष आवडीचे विषय. साप्ताहिक विवेक, अमृत मासिक, गांवकरी, लोकमत या दैनिकांमध्येही त्यांनी लेखन केले. ‘गांवकरी’मध्ये लिहिलेल्या ‘शब्दचर्चा’ या सदरातील मजकुराचा समावेश असलेले त्याच नावाचे पुस्तकही सरांनी प्रकाशित केले. या पुस्तकात सुमारे एक हजार वैशिष्टय़पूर्ण शब्दांचा समावेश करण्यात आला असून त्या शब्दांची व्युत्पत्ती, (झालेला असल्यास) अपभ्रंश अशी सर्व माहिती मांडली आहे.
रामायणाचा अभ्यास करताना वाल्मिकीने लिहिलेल्या रामायणात नंतरच्या काळात अनेक कथा घुसडण्यात आल्याचे सरांच्या लक्षात आले. अशा गोष्टींना ‘प्राक्षिप्त’ असे म्हणतात असे सरांनीच एकदा आपणास सांगितल्याचे प्रा. पिंपळे यांनी म्हटले आहे. या सर्व गोष्टी काढून टाकून मूळ रामायणाच्या आधारे प्रभू रामचंद्रांचे जीवनदर्शन घडविण्याच्या ध्यासातून त्यांनी ‘नव्याने रामकथा गाऊ’ हा संशोधनपर ग्रंथ अतिशय समतोलपणाने लिहिला. या ग्रंथामुळे वाचकांना रामायणासंबंधी नवीन दृष्टी प्राप्त करून दिल्याचे मतही प्रा. पिंपळे यांनी मांडले आहे. ‘मनुस्मृती’ या ग्रंथासंबंधी अनेकदा उलट सुलट चर्चा ऐकायला मिळते. या संबंधीची वस्तुस्थिती समाजापुढे यावी या हेतूने त्यांनी ‘मनू आणि स्त्री’ या पुस्तकाचे लेखन केले. अगदी अलीकडील काळात सरांनी ‘भगवद्गीतेतील पुनर्जन्म कल्पना’ हे पुस्तक लिहिले. याशिवाय ‘उपनिषदांतील कथा’ पुस्तकही सरांनी लिहिले. सुभाषित म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या वाड्:मयाचा आजच्या जीवनात काय उपयोग असे एखाद्याला वाटू शकेल म्हणून सरांनी सुभाषितांची चोखंदळपणाने निवड करीत ‘व्यावहारिक शहाणपणासाटी ३०१ सुभाषिते’ हे पुस्तक लिहिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीही त्यांनी स्फुट लेखन केले. ‘पराक्रमी युवक अनंत कान्हेरे’या नावाचे छोटेखानी पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या विक्रीतून आलेले उत्पन्न त्यांनी ‘कान्हेरे स्मारक समिती’ ला अर्पण केले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघातही त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. गोळवलकर गुरूजींच्या सहवासाचे भाग्यही त्यांना लाभले. चाळीस वर्षांपूर्वी एसएससीला असताना सरांनी केलेल्या नेटक्या मार्गदर्शनामुळेच आपली संस्कृत विषयात प्रगती झाल्याचे प्रा. पिंपळे यांनी नमूद केले आहे.