नटश्रेष्ठ बालगंधर्व हे माझेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत होते. बालगंधर्व ही परमेश्वरी देणगी होती. बालगंधर्व पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ हार्मोनियमवादक आणि बालगंधर्वांचे सहकारी पं. पुरुषोत्तम वालावलकर यांनी अलीकडेच केले.
सांस्कृतिक कार्यसंचालनालयातर्फे  बालगंधर्वाच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने शिवाजी मंदिरात आयोजित कार्यक्रमात एका ध्वनिचित्रफितीद्वारे पं. वालावलकर यांनी रसिकांशी संवाद साधला. या निमित्ताने नव्वद वर्षीय पं. वालावलकर यांचा सत्कार केला जाणार होता. परंतु वयोपरत्वे ते प्रत्यक्ष उपस्थित राहून शकल्याने त्यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफित या वेळी दाखविण्यात आली.
लहानपणापासूनच मला बालगंधर्वाचा प्रत्यक्ष सहवास मिळाला, हे माझे भाग्य होते. माझा रंगभूमीवरील प्रवेश वयाच्या चौथ्या-पाचव्या वर्षी दस्तुरखुद्द बालगंधर्व यांच्या कडेवर बसून झाला. पुढे त्यांच्या अनेक नाटकांच्या निमित्ताने त्यांना संगीतसाथ करताना त्यांच्या  सहवासात राहाता आले, असे पं. वालावलकर यांनी सांगितले.