महापालिकेच्या नव्या नियमानुसार झालेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूर्व नागपूरचे लकडगंज प्रभागाचे नगरसेवक नरेंद्र उपाख्य बाल्या बोरकर यांची बिनविरोध निवड झाली असून मावळते अध्यक्ष अविनाश ठाकरे यांच्याकडून त्यांनी आज अध्यक्षपदाचा पदभार सांभाळला.
विभागीय आयुक्त कार्यालयाने महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना जाहीर केल्यानंतर मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ करण्यात आला. नागपूर विकास आघाडीने बाल्या बोरकर यांच्या नावाची घोषणा यापूर्वीच केली होती. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आज केवळ औपचारिकता शिल्लक होती. अविनाश ठाकरे, हर्षला अन्सारी, विषया खोब्रागडे, विद्या कन्हेरे, संगीता गिरे यांनी सूचक आणि अनुमोदन दिले. बोरकर यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने बोरकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे कृष्णा यांनी घोषित केले.  
बाल्या बोरकर यांच्या पदग्रहण समारंभाच्यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस म्हणाले, संक्रमणाच्या काळात बाल्या बोरकर यांच्यावर स्थायी समिती म्हणून जबाबदारी आली आहे. हा काळ आव्हानाचा असून त्यांची भूमिका ही महाभारतातील अर्जुना सारखी आहे. आतापर्यंत दयाशंकर तिवारी, अविनाश ठाकरे यांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने अनेक विकासात्मक निर्णय घेऊन शहराचा विकास केला आहे. स्थानिक स्वराज्य कर लागू झाल्यानंतर महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असताना महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. बोरकर बेधडक आहे. कामाचा पाठपुरावा करून ते मार्गी लावण्याची त्यांची ख्याती आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक घडी बसविण्यासोबत शहराचा विकासासाठी त्यांनी काम करावे. स्थायी समितीचा अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो. त्यामुळे बोरकर यांनी सर्व पक्षातील नगरसेवकांना विश्वासात घेऊन न्याय द्यावा, असेही फडणवीस म्हणाले. यावेळी महापौर अनिल सोले, उपमहापौर जैतुनबी अंसारी, विरोधी पक्ष नेते विकास ठाकरे, आमदार विकास कुंभारे, शहराध्यक्ष कृष्णा खोपडे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, अविनाश ठाकरेंसह विविध पक्षाचे गटनेते उपस्थित होते. यावेळी महापौर अनिल सोले, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे आणि विकास कुंभारे यांची भाषणे झाली.
बाल्या बोरकर यापूर्वी दोनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. सध्या लकडगंज प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. बोरकर यांनी यापूर्वी स्थायी समितीच्या सदस्य आणि त्यानंतर जकात विभागाचे सभापती म्हणून काम बघितले आहे.
जकात विभागात असताना त्यांनी त्यातून महापालिकेचे उत्पन्न वाढविले होते. भाजयुमोचे सदस्य म्हणून पक्षात काम करताना त्यांनी पूर्व नागपूरचे महामंत्री, अध्यक्ष आणि शहर कार्यकारिणीत महामंत्री म्हणून संघटनात्मकदृष्टय़ा काम केले आहे.
उत्पन्नाचा स्रोत वाढविणार – बोरकर
पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करताना स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पक्षाने दिली आहे.  स्थानिक स्वराज्य करामुळे महापालिकेच्या उत्पन्नाचा स्रोत कसा वाढविता येईल त्यासाठी प्रयत्न करणार आहे. विशेषत: व्यापाऱ्यांना आणि सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेऊन शहराचा विकास करणार आहे. शहराच्या विकासाला प्राधान्य देताना महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल यादृष्टीने प्रयत्न करणार. केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या नव्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचविणार. सहा महिने आचारसंहितेमध्ये जाणार असले तरी त्या काळात उत्पन्न वाढविण्यासाठी काम केले जाईल. आचारसंहितेमुळे काम करण्याचा अवधी कमी मिळणार असला तरी मिळेल त्या वेळेचा सदुपयोग करणार असल्याचे बोरकर म्हणाले.