बांबू उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असून त्यापासून अनेक बेरोजगार युवकांना रोजगार मिळू शकतो. या बांबू उत्पादनाबद्दल जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
महापालिका, विदर्भ बांबू मिशन आणि शिवाजी नागरिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीनगर उद्यानात इको फ्रेंडली उपवन बांबू केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या केंद्रात वाचनालय राहणार आहे. या वाचनालयाचे उद्घाटन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. महापौर अनिल सोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला आमदार सुधाकरराव देशमुख, उपमहापौर जैतुनबी अंसारी, स्थायी समितीचे अध्यक्ष अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते प्रवीण दटके, आयुक्त श्याम वर्धने, धरमपेठ झोन सभापती वर्षां ठाकरे आदी महापालिकेचे पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. या केंद्रामुळे पर्यावरण राखण्यास मदत होणार आहे. तसेच या क्षेत्रातील दलित आदिवासी बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होईल. अल्प दरात घराचे बांधकाम करण्यासाठी मातीच्या विटांऐवजी फ्लाय अ‍ॅशच्या विटांचा वापर करावा, उद्यानातील पालापाचोळा एकत्रित करून त्यापासून गांडूळ खत निर्मिती करावी. शहरातील नाल्याजवळ पाणी शुद्धीकरण करून बांधकामासाठी वापर करावा. तसेच बांबूचा वापर करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांनी संशोधन करावे तसेच सिमेंटमध्ये फ्लाय अ‍ॅशचा उपयोग करून रस्त्याच्या बांधकामासाठी वापर करता येईल, असेही गडकरी म्हणाले.
उद्यानात काँक्रिटच्या वापरामुळे तेथील तापमान वाढते त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहतो. त्यासाठी जनतेला पर्यावरणपूरक बांबू तंत्राबद्दल जागरूक करायचे असल्याने या उपवन बांबू वाचनालयाची निर्मिती केली आहे. हे वाचनालय बांबूच्या तरटय़ांनी उभारले असल्याने ते मजबूत तर आहेच पण सोबत नैसर्गिकरित्या सुंदर आहे. ही वास्तू लोकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. या संकल्पनेचा वापर नगरसेवकांनी आपापल्या भागातील उद्यानामध्ये करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.
यावेळी विदर्भ बांबू मिशनचे समन्वयक सुनील जोशी यांचा गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बांबूपासून विविध वस्तू तयार करणारे गुरेलाल अहिया, जगन धुर्वे, सुखदेव गराडे, रामू डोंगरे, लेखचंद लांजेवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्लीचे अध्यक्ष प्रा. उदय गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली बांबूचे अद्भूत जग, तर देखो सिखो और करो या विषयावर संघटनेच्या सदस्यांची भाषणे झाली. नितीन गडकरी यांनी कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमाला प्रभाकरराव मुंडले, शेफ विष्णू मनोहर, माजी नगरसेवक राजन भूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अविनाश ठाकरे यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. निखिल मुंडले यांनी आभार मानले.