साईनगरीचे विद्रूपीकरण टाळण्यासाठी शिर्डी नगरपंचायतीने शहरात जाहिरात फलक तसेच फ्लेक बोर्ड लावण्यास बंदी घातली आहे. असा निर्णय घेणारी जिल्ह्यातील ही एकमेव नगरपंचायत असल्याची माहिती नगराध्यक्ष सुमित्रा कोते यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने शहरात सार्वजनिक जागी फ्लेक लावण्यास मनाई केली होती, यामुळे काही दिवसच या निर्णयाची अंमलबजावणी झाली. त्यानंतर पुन्हा, दादा-नाना-भाऊंचे फलक रस्तोरस्ती झळकू लागले होते. यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी नगरपंचायतीने एकमुखी ठराव करुन शहरात फ्लेक व जाहिरात होर्डिंग्जवर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरातून जाणा-या नगर-मनमाड मार्गावरील विजेचे खांब, नगर पंचायत कार्यालय व लगतच्या शॉपिंग कॉम्प्लेकमोर नांदुर्खी रोड, कनकुरी रोड, जुना व नवीन पिंपळवाडी रोड, पालखी रोड, शहरातील अंतर्गत रस्ते, नगर पंचायत कार्यालयासमोरील पूर्व बाजू इत्यादी ठिकाणी सर्वच प्रकारच्या फलकांना व जाहिराती लावण्यास मनाई करण्यात आली आहे असे कोते यांनी सांगितले. या वेळी उपनगराध्यक्ष गोपीनाथ गोंदकर, बांधकाम सभापती उत्तम कोते, मुख्याधिकारी बद्रिकुमार गावित, मालकर आदी उपस्थित होते.
शिर्डी शहराचे होणारे विद्रूपीकरण तसेच नागरिक, भाविक व वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सुमित्रा कोते यांनी सांगितले.
उल्लंघन करणा-यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे स्वस्तात प्रसिद्धी करवून घेण्यासाठी शहराचे व्रिदूपीकरण करणा-यांना मोठा चाप बसणार आहे.