उरणसह सर्वत्र क्रिकेटच्या हंगामाला जोरदार सुरुवात झाली असून डोळे दिपवून टाकणाऱ्या लखलखत्या प्रकाशात खेळविल्या जाणाऱ्या नाइट क्रिकेटच्या मॅचेस अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत खेळविल्या जात आहेत. या नाइट क्रिकेटना चाप बसणार असून न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही संघाला रात्री दहानंतर स्पीकर वाजविण्याची परवानगी नसल्याने, कायद्याचा भंग करून मॅचेस सुरू ठेवल्यास पोलीस कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांकडून देण्यात आलेले आहेत.

हौस, विरंगुळा तसेच फिटनेससाठी खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यांचे स्वरूप आता बदलू लागले आहेत. गावोगावी दर शनिवार- रविवार तसेच सुट्टीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटवर लाखो रुपयांची उधळण होऊ लागली आहे. त्यामुळे या खेळात खेळ कमी आणि बाजार अधिक होऊ लागला आहे. खेळातील वाढत्या आकर्षणामुळे राजकीय पक्षांकडूनही दरवर्षी लाखो रुपयांची बक्षिसे लावून नाइट क्रिकेटचे सामने भरू लागले आहेत. या खेळाच्या बाजारीकरणामुळे खऱ्या खेळाडूंना स्थानच नसल्याने सच्च्या खेळाडूंकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या नाइट क्रिकेटच्या स्पर्धा लांबणीवर पडल्या आहेत.मात्र सुट्टीच्या दिवसांत गावोगावच्या स्पर्धा सुरूच आहेत.
परीक्षांच्या काळात नियंत्रणाचे प्रयत्न
क्रिकेटच्या स्पर्धाचा सर्वात अधिक फटका हा शहरी तसेच ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांवर होत असल्याने क्रिकेट खेळण्यासाठी तसेच सामने पाहण्यासाठी दहावी तसेच बारावी या महत्त्वाच्या वर्गातील विद्यार्थी आपला वेळ वाया घालवीत असल्याने दहावी तसेच बारावीच्या परीक्षा होईपर्यंत पुढील एक ते दीड महिन्यासाठी क्रिकेटच्या स्पर्धा कमी करण्यात याव्यात यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच सामाजिक सस्थांनी प्रयत्न चालविले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांनी दिली आहे. नाइट क्रिकेटच्या स्पर्धासाठी पोलीस परवानगी तसेच स्पीकर परवाना आवश्यक असून न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहा वाजेपर्यंतच हा स्पीकर परवाना दिला जातो. त्यापलीकडे स्पीकरचा वापर केल्यास पोलीस कारवाई करून गुन्हे दाखल करतील, अशी माहिती न्हावा शेवा विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली आहे.