बनारसी साडी हा भारतीय फॅशनचा आत्मा आहे. हातमागावर विणल्या जाणाऱ्या या बनारसी साडीसाठी लागणारा कालावधी, बनारसी कारागिरांची कला आणि मेहनत हे सगळे गणित धरले तर या महागडय़ा साडय़ा योग्य त्या बाजारभावात विक णे कारागिरांना शक्य होत नाही. बनारसी कारागिरांच्या हातात ‘लाख’ मोलाची कला आहे, पण त्या कलेचे मोल पैशांच्या रूपात त्यांच्या हातात क्वचितच पडते. कारागीर आणि बाजार यांच्यातला दुवा सांधण्यासाठी ‘लॅक्मे फॅशन वीक’ने आपले व्यासपीठ उपलब्ध केले असून ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालया’तच या बनारसी फॅशनचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. फॅशन डिझायनर आणि भाजप नेत्या शायना एन. सी. यांच्या संकल्पनेतून ‘री-इन्व्हेन्ट बनारस’ नामक आगळेवेगळे फॅ शन प्रदर्शन २७ ऑगस्टला ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालया’त आयोजित करण्यात आले आहे. फॅ शन डिझायनर पद्मश्री रितू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून फॅ शन इंडस्ट्रीतील शंभर नावाजलेल्या फॅ शन डिझायनर्सचा यात सहभाग असणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने बनारसच्या कारागिरांची कला लोकांसमोर आणणे हा मुख्य उद्देश असून पहिल्यांदाच फॅ शन डिझायनर्स आणि कारागीर एकत्र येणार आहेत. या प्रदर्शनात शंभर डिझायनर्स आणि कारागिरांनी मिळून तयार केलेला एकेक पोशाख बघायला मिळणार असून त्याची माहिती खुद्द कारागीर देणार आहेत, अशी माहिती शायना एन. सी. यांनी दिली. बनारसी साडीबरोबरच बनारसी कलाकुसर असलेले कुर्ते, पाश्चिमात्य धाटणीचे जॅकेट्स, लेहेंगा अशा नानाविध पद्धतींमध्ये हे पोशाख सादर केले जातील. यासाठी प्रत्येक डिझायनरने बनारसमध्ये काही दिवस राहून कारागिरांबरोबर या पोशाखाचे डिझाइन, त्यासाठी वापरण्यात येणारे सिल्कचे कापड, रंग, त्याचा पोत अशा बारीकसारीक गोष्टींवर काम करून नवीन पोशाख तयार केले आहेत, असे रितू कुमार यांनी सांगितले. गेली ४५ वर्षे फॅ शन इंडस्ट्रीत काम करणाऱ्या रितू कुमार यांच्याबरोबरच अनीता डोंगरे, रितू बेरी, गौरव गुप्ता, वरुण बहल, रीना ढाका, कृष्णा मेहता, श्रुती संचेती, अभिषेक गुप्ता आणि मूळचा बनारसचाच असलेले फॅ शन डिझायनर हेमांग अग्रवाल यांसारख्या नावाजलेल्या फॅ शन डिझायनर्सचा यात सहभाग असणार आहे.
‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालया’त
फॅ शन ‘शो’ नाही, ‘प्रदर्शन’ होणार
मध्यंतरी संग्रहालयात फॅ शन शो आयोजित केला गेल्यामुळे संग्रहालयाच्या संचालकांवर टीका झाली होती. मात्र, संग्रहालय हे कलेशी जोडलेले असल्याने फॅ शनचाही या कलेत समावेश आहे. डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयात फॅ शन ‘शो’ नाही तर ‘प्रदर्शन’ भरवण्यात आले आहे, असे संग्रहालयाच्या संचालक तस्नीम मेहता यांनी स्पष्ट केले. मात्र, ‘फॅशन’कडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पाश्चिमात्य संग्रहालयांच्या धर्तीवर इथल्याही संग्रहालयांमध्ये फॅ शन प्रदर्शन व्हायला हवेत आणि तसा प्रस्ताव लवकरच वस्त्रोद्योग मंत्रालयासमोर ठेवणार असल्याचेही मेहता यांनी सांगितले.