महापालिकेतर्फे दरवर्षी रस्त्याच्या डागडुजीवर कोटय़वधी रुपये खर्च केले जात असले तरी महिन्याभराच्या पावसामुळे मात्र रस्त्यांची अवस्था फारच बिकट झाली आहे. अतिवृष्टीनंतर रस्त्यांवरील खड्डय़ांनी त्यांचे अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. जखमेवर मलमपट्टी केली जावी, त्याप्रमाणे महापालिकेने रस्त्यांवर गिट्टीचे मिश्रण पसरविले. पण, ही मलमपट्टी मुसळधार पावसाने उघडी पाडली आणि नागरिकांना त्याचा त्रास आता जाणवू लागला आहे. गाडय़ा पंक्चर होण्याचे आणि दुचाकी वाहन घसरून चालक जखमी होण्याचे प्रकार अचानक वाढले आहेत.
खड्डे बुजविण्याकरिता शास्त्रशुध्द तंत्राचा वापर करण्यात आलेला नाही. यामुळे ठिकठिकाणी रस्त्यांवरील गिट्टी उखडून खड्डे पडले आहेत. ही गिट्टी आता रस्त्यांवर पसरली आहे. महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने झालेल्या अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्यावरून धावणाऱ्या वाहनांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चाकाखाली येणारी गिट्टी व दगडे उसळून पादचारी व वाहनचालक जखमी झाल्याच्या घटना शहरात घडत आहेत. पावसाळ्यापूर्वी महापालिकेने शहरातील विविध भागातील रस्त्यांवरील खड्डे जेट पॅचद्वारे बुजविले असले तरी मुसळधार पावसामुळे ते उखडले आहेत. रस्त्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण, असा प्रश्न आता जनतेला पडला आहे. अशी परिस्थिती शहरातील अनेक ठिकाणी  आहे. दरवर्षी पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडत असतानाही त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली जात नाही. रस्त्यांवरील खड्डय़ात मुरूम व गिट्टी टाकून आणि हलक्या दर्जाचे डांबर वापरून थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारे रस्ते पहिल्याच पावसामुळे खराब झाले आहे. ग्रेट नाग रोडसह महाल, इतवारी, हनुमाननगर, प्रतापनगर, गावंडे लेआऊट, सहकारनगर, मानेवाडा रिंग रोड, बेसा, नारा, नारी या भागातील रस्त्याची अवस्था तर अत्यंत वाईट झाली आहे. शहरातील काही भागात सिमेंटचे रस्ते करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, कंत्राटदार आणि प्रशासन यांच्या वादामुळे ते काम बंद पडले आहे. रिंग रोडवर जड वाहनांची वाहतूक वाढली आहे. यामुळे रस्त्यांची पार वाट लागली आहे. उखडलेल्या गिट्टीमुळे वाहनांचे टायर फुटणे, पंक्चर होणे, अपघात होणे हे समीकरण शहरात अनेक ठिकाणी पाहावयास मिळते. या समस्येवर महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.