स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) भरणा न केल्याने शहरातील दोन, तसेच स्थानिक संस्था करअंतर्गत नोंदणी न केल्याने एक अशा तीन बीअर शॉपीवर महापालिकेने शनिवारी दंडात्मक कारवाई केली. एका दुकानचालकाकडून या दरम्यान दंडापोटी दहा लाखांचे धनादेश जमा करण्यात आले.
शहरातील एपीआय कॉर्नर येथील निशा बीअर अॅण्ड वाइन शॉपीने ऑक्टोबर २०११ पासून स्थानिक संस्था कराचा भरणा केला नाही, तसेच विवरणपत्रही भरले नव्हते. त्यामुळे महापालिकेने दुकान सील करण्याची कारवाई सुरू करताच या दुकानमालकाने १० लाख रुपये रकमेच्या दंडाचे चार धनादेश महापालिकेकडे जमा केले. मुकुंदवाडी येथील गंगोत्री बीअर शॉपीने ३४ हजार ९४२ रुपयांचे धनादेश दिले होते. मात्र, ते वटले नाहीत. तसेच अपेक्षित अडीच ते तीन लाख रुपये कर न भरल्याने हे दुकान सील करण्यात आले. गारखेडा येथील युवा बीअर शॉपी ऑगस्ट २०१२ पासून सुरू झाले. मात्र, या दुकानदाराने स्थानिक संस्था करअंतर्गत नोंदणी केली नव्हती. त्यामुळे हे दुकानही सील करण्यात आले. अपेक्षित कराची रक्कम २ लाख रुपये व शास्ती रक्कम येणे बाकी आहे.
या दुकानांवर कारवाई करण्यासाठी उपायुक्त पेडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक संस्था कर विभागामार्फत अधिकारी अयुब खान, महावीर पाटणी यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक मनोहर सुरे, कर निरीक्षक बी. बी. साळवे, व्ही. एस. गायकवाड आदींसह पोलीस पथक उपस्थित होते.