एका टेम्पोमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारामुळे दहिसर आणि मीरा भाईंदरच्या वेशीवरील गणपत पाटील नगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मात्र त्या वस्तीसाठी असे प्रकार काही नवीन नाहीत. एक फेरफटका या गुंडाच्या वस्तीचा..
बंद टेम्पोमध्ये एका तरुणीवर चार गुंडांनी केलेल्या बलात्कारामुळे दहिसरचे गणपत पाटील नगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मुळात गणपत पाटील नगर कायम वाईट गोष्टींसाठीच चर्चिले जाते. राजकारण्यांनी मतपेढीवर डोळा ठेवून वसवलेल्या या वस्तीत अधिकृत, नियमित जवळपास काहीच नाही. मुंबईतून आणि अन्य शहरे व राज्यांतून तडीपार झालेले गुंड, भुरटे चोर यांनीच वसवलेली ही वस्ती आहे. सर्रास खारफुटी तोडून, त्या जागी भराव घालून अनधिकृत गॅरेज, वाहनतळ, गोदामे उभी राहिली आहेत. चोरीच्या वीजेच्या झगमगाटात उजळलेल्या या झोपडपट्टीत पाणी माफियांचा वावर आहे. आता तर थेट खारफुटीतून या झोपडपट्टीने मिरा-भाईंदरच्या दिशेने कूच सुरू केली आहे. बलात्कारामुळे हा परिसर कालपासून पुन्हा चर्चेत आला असला तरी तिथल्या रहिवाशांच्या दृष्टीने फार काही वावगे घडलेलेच नाही.
या विभागातून आलटून पालटून काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतात. या दोन्ही पक्षांनी या अनधिकृत झोपडपट्टीवासीयांवर सुविधांची खैरात केली आहे. दहिसर आणि मिरा-भाईंदरच्या वेशीवरील या वस्तीत गुंडांचा मोठा वावर असल्याने येथे कायम हाणामाऱ्या होतच असतात. मोठय़ा प्रमाणावर वेश्याव्यवसायही येथे नेहमीच चालतो. ‘पाणी माफिया’ हा अतिशय फायदेशीर ‘व्यवसाय’ या वस्तीत बहरला आहे. येथून जाणारी ३६ इंच व्यासाची जलवाहिनी फोडून झोपडपट्टीवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. आसपासच्या सोसायटय़ांमध्ये जाणाऱ्या या जलवाहिन्या फोडून पाण्याची चोरी होत असूनही त्यांना अडविण्याची धमक ना राजकारण्यांमध्ये आहे, ना प्रशासनात आहे ना पोलिसांमध्ये! त्यामुळे या परिसरात दुषित पाण्याची समस्या कायम भेडसावत असते.
पाणी चोरी रोखण्याचा देखावा करण्यासाठी शिवसेनेचेआमदार विनोद घोसाळकर यांनी आमदार निधीतून १४ पाण्याच्या टाक्या बसविल्या. म्हणजे वस्ती अनधिकृत. तेथील रहिवासी जलवाहिन्या फोडून ते विकून जबर पैसा कमावतात. त्याचा फटका पाणीकपात आणि दूषित पाण्याच्या रूपाने पाणीकर भरणाऱ्या नागरिकांना बसणार. आणि हे टळावे म्हणून कनवाळू आमदार जनतेच्या पैशातून पाण्याच्या टाक्या बसवणार आणि त्यावर आपल्या नावाची जाहिरात करणार. घोसाळकरांपाठोपाठ आता इतर पक्षांनीही पाण्याच्या टाक्या बसवून झोपडपट्टीवासीयांना भुलविण्याचा सपाटा लावला. तसेच ‘रिलायन्स एनर्जी’च्या विजेची चोरी नेहमी होते. या चोरीच्या विजेवरच ही झोपडपट्टी उजळून निघाली आहे. झोपडपट्टीत गल्लोगल्ली व्हीडिओ पार्लरचा आहे. या पार्लरमध्ये दाखविले जाणारे चित्रपट म्हणजे ‘ब्ल्यू फिल्म’च असतात. स्वाभाविकच आंबटशौकिनांची येथे नेहमीच गर्दी असते.
पत्र्याच्या शेडच्या आत पक्क्य़ा भिंतीच्या घरांची संख्या येथे रोजच वाढत असते. या झोपडपट्टीत पाच हजारांहून अधिक मतदार असून तो या वस्तीचा ‘यूएसपी’ आहे. दोन महिन्यांपूर्वी या भागात नव्या मतदारांची नोंदणी झाली. त्यावेळी तब्बल १५०० जणांनी अर्ज भरले.
झोपडपट्टीच्या शेजारून जाणारा लिंक रोड रात्री वाहनतळ होतो. दोन हजारांहून अधिक रिक्षा, टेम्पो येथे उभ्या असतात. त्याचबरोबर खारफुटी तोडून मोकळ्या केलेल्या विस्तीर्ण भूखंडावर बसगाडय़ा उभ्या करण्यासाठी भव्य वाहनतळ उभा राहिला आहे.
आठ महिन्यांपूर्वी खारफुटीपासून ५० मीटर अंतरावरील झोपडय़ा पालिकेने तोडल्या. मात्र नेहमीप्रमाणेच काही दिवसांतच त्या पुन्हा उभ्या राहिल्या. १७ वर्षीय मुलीवरील बलात्काराच्या निमित्ताने या वस्तीची चर्चा नव्याने सुरू झाली. मात्र ‘अशाच’ कारणांसाठी ही वस्ती पुन:पुन्हा चर्चेत येत राहणार याबाबत कोणतीच शंका नको. राजकारणी, प्रशासन, पोलीस आणि गुंड यांची हातमिळवणी झाल्यावर काय होते याचा याचा अभ्यास कुणाला करायचा असल्यास गणपत पाटील नगर हे उत्तम ‘मॉडेल’ आहे.