शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते खरेदीसाठी वेळेवर पीककर्ज मिळणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, या साठी दि. १५ जुलपर्यंत जिल्हय़ातील सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांनी सुटीच्या दिवशीही बँका सुरू ठेवाव्यात. पीककर्जापासून एकही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात खरीप हंगामाची आढावा बठक पालकमंत्री क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झाली. राज्यमंत्री सुरेश धस, आमदार प्रकाश सोळंके, बदामराव पंडित, अमरसिंह पंडित, पृथ्वीराज साठे, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर आदी उपस्थित होते. मंत्री क्षीरसागर म्हणाले, की शेतकऱ्यांसाठी पीककर्ज जिव्हाळय़ाचा प्रश्न असून तो वेळेत सुटला नाही, तर शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सर्व बँकांनी त्यांना ठरवून दिलेल्या पीककर्जाचे उद्दिष्ट १५ जुलपर्यंत पूर्ण केले पाहिजे. तसेच बँकांनी उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. पीककर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांनी सौजन्याची वागणूक द्यावी. एक लाख रुपयांच्या कर्जापर्यंतकुठलेही गहाणखत करून घेऊ नये. तसेच अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नये. टंचाईगस्त भागातील शेतकऱ्यांच्या पूर्वीच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना कर्जासाठी पात्र ठरविण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे. शेतकऱ्यांकडून व्याजाची वसुली करू नये.
चालू खरीप हंगामासाठी जिल्हय़ाचा १ हजार ८८ कोटींचा कृती आराखडा तयार असून, उद्दिष्टाप्रमाणे पीककर्ज वाटपासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी तलाठी, ग्रामसेवक, बँकेचे अधिकारी, सर्व संबंधित अधिकाऱ्यांची तालुकानिहाय बठका घेऊन शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळण्यास नियोजन करावे. उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या बँकेच्या अधिकारी व बँकेविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच बँकेत शेतकऱ्यांची तक्रार नोंदवण्यासाठी नोंदवही ठेवण्याच्या सूचना क्षीरसागर यांनी केल्या.