ढगाळ हवामानामुळे सर्वच रब्बी पिकाचे व भाजीपाल्याचे नुकसान झाल्याने पिकासाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे आणि बँकेत गहाण ठेवलेले दागिने कसे सोडवायचे, या विवंचनेत अडकलेल्या मौजे-गातेस खुर्द येथील रमेश अनंता पष्टे (४९) या कर्जबाजारी शेतकऱ्याने बुधवारी सकाळी शेतावर विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
रमेश पष्टे या शेतकऱ्याने भातपिकासाठी सेवा सहकारी संस्थेकडून ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते, मात्र विविध कीड रोगांमुळे भातपिकाचे नुकसान झाल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नव्हती. असे असतानाच त्यांनी रब्बी पिकासाठी सेवा सहकारी संस्थेकडून पुन्हा ५० हजारांचे कर्ज घेऊन तीन एकर शेतीमध्ये हरभरा, वाल, मूग अशा कडधान्याची महिनाभरापूर्वी पेरणी केली होती. याशिवाय एक एकर जागेमध्ये भेंडीची लागवड केली होती. त्यासाठी पत्नीचे सर्व दागिने बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले होते. मात्र गेल्या १५ दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे या रब्बी पिकांचे तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे आणि दागिने कसे सोडवायचे, अशी चिंता रमेश पष्टे यांना सतावत होती. तसेच कर्जाचा डोंगर असल्यामुळे दोन मुलींची लग्न कशी करायची, अशा विवंचनेत ते सापडले होते. यातूनच त्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, गेल्या १५ दिवसांच्या ढगाळ हवामानामुळे रब्बी पीक हातचे गेल्याने गातेस गावातील शेतकऱ्यांनी गेल्याच आठवडय़ात संबंधित अधिकाऱ्यांकडे नुकसानभरपाईबाबतचे निवेदन दिलेले आहे.