चिमुकल्या मुलांना मानवी मनोऱ्यांवर चढवून दहीहंडीचा विकृत आनंद मिळविण्याचे प्रकार ‘महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगा’च्या आदेशामुळे थांबणार असले तरी ही बंदी सरसकट नको, अशी मागणी दहीहंडी हा सण शैक्षणिक उपयुक्ततेतून साजरा करणाऱ्या शाळा करीत आहेत. मुंबई-ठाण्यातील अनेक शाळांमध्ये गोकुळाष्टमीचा सण मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. याचाच एक भाग म्हणून लहान मुलांचे मनोरे रचून दहीहंडी फोडली जाते. मुलांमध्ये शालेय जीवनातच एकोपा, संघवृत्ती, आत्मविश्वास निर्माण व्हावा हा उपयुक्ततावादी दृष्टिकोन या आयोजनामागे असतो. पण, १४ वर्षांखालील बालगोविंदांचा मानवी मनोऱ्यांमध्ये समावेश करण्यात येऊ नये, या आयोगाने घातलेल्या बंदीचा परिणाम आमच्या या स्तुत्य व विद्यार्थीप्रिय अशा शैक्षणिक उपक्रमावर व्हायला नको, अशी भावना शाळा मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.
१४ वर्षांखालील मुलांना दहीहंडी फोडण्यासाठी रचण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांवर चढविण्यात येऊ नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. मात्र, अनेक शाळांमध्ये दहीहंडी शालेय उपक्रम म्हणून साजरा केला जातो. त्यात विद्यार्थ्यांचे मानवी मनोरेही रचले जातात. म्हणूनच आयोगाच्या बंदीचा फटका आमच्या या उपक्रमाला बसू नये, अशी भावना मुख्याध्यापक व्यक्त करीत आहेत.
घाटकोपरमधील ‘शिवाजी शिक्षण संस्थे’च्या विस्तृत पटांगणात दरवर्षी कृष्णाष्टमी मोठय़ा उत्साहाने साजरी केली जाते. यात पूर्व प्राथमिक, प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाते. कृष्णजन्म साजरा करणे, दहीकाला, सुंठवडा वाटणे या बरोबरच मुलांचे तीन ते चार थरांपर्यंतचे मनोरे उभारून दहीहंडी फोडणे हा कृष्णाष्टमीच्या साजरीकरणाचा महत्त्वाचा भाग असतो. वरच्या वर्गातील विद्यार्थी तर एका मजल्यापर्यंत मनोरे उभारतात. लहान मुलांसाठी खेळणीहंडी, चॉकलेटहंडी उभारून त्यात गंमत आणली जाते. तर मोठय़ा वर्गातील विद्यार्थ्यांना पुस्तके बक्षीस म्हणून दिली जातात. ‘सणांचे महत्त्व मुलांच्या मनावर बिंबवण्याबरोबरच त्यांच्यात एकोप्याची, संघवृत्तीची भावना निर्माण करण्यासाठी दहीहंडीचा उपक्रम उपयुक्त ठरतो. पण, मुलांचा मनोऱ्यांमध्ये वापर नको, या आयोगाच्या बंदीचा आमच्या या उपक्रमावर परिणाम व्हायला नको,’ अशी भावना या शाळेचे मुख्याध्यापक (इंग्रजी माध्यम) जगदीश इंदुलकर यांनी व्यक्त केली.
‘दहीहंडीचे आयोजन शाळास्तरावर करताना आम्ही मुलांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतो. त्यासाठी मुलांकडून पुरेसा सरावही करून घेतला जातो. या आयोजनाकडे आम्ही शालेय उपक्रम म्हणून पाहतो. त्याला कुठेही व्यावसायिक स्वरूप नसते. त्यामुळे, या बंदीमधून शाळांना वगळायला हवे,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
हीच भावना खारच्या ‘महात्मा गांधी विद्या मंदिर शाळे’चे सचिव मिलिंद चिंदरकर यांनीही व्यक्त केली. ‘आम्हीही शाळेमध्ये दहीहंडी उत्साहाने साजरी करतो. बक्षीसाच्या लालसेने रचल्या जाणाऱ्या मानवी मनोऱ्यांची तुलना शाळेच्या दहीहंडीशी करता येणार नाही. राजकीय चढाओढीतून या मनोऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. या उलट आम्ही दहीहंडीतून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना रुजविण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे, शाळांना यातून वगळले गेले पाहिजे,’ अशी मागणी त्यांनी केली. ‘बंदी राहिली तरी आमच्या शाळेत हा सण त्याच उत्साहाने साजरा करणार आहोत,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.