27 January 2021

News Flash

प्रेमाच्या भानगडींमध्ये हरवली वटपौर्णिमा

आपल्याकडच्या प्रत्येक सणासुदीचे महत्त्व घराघरात ठाण मांडून बसलेल्या छोटय़ा पडद्याच्या दृष्टीने फार वेगळं असतं. आजच्या घडीला टीव्हीवरची प्रत्येक मालिका, मालिकेतला प्रत्येक घटक हा घरातलाही सदस्य

| June 23, 2013 05:21 am

आपल्याकडच्या प्रत्येक सणासुदीचे महत्त्व घराघरात ठाण मांडून बसलेल्या छोटय़ा पडद्याच्या दृष्टीने फार वेगळं असतं. आजच्या घडीला टीव्हीवरची प्रत्येक मालिका, मालिकेतला प्रत्येक घटक हा घरातलाही सदस्य होऊन बसलाय. त्यामुळे आपल्याकडे गणपती आले की मग टीव्हीवर सध्या गाजत असणाऱ्या सरदेशमुख, मुधोळकर आदी मंडळींच्या घरामध्येही गणपती येतो. त्यांच्याकडेही दिवाळी साजरी होते. असा सणासुदीचा आनंद या घरचे त्या टीव्हीवरच्या घरच्यांशी मिळून साजरा करत असतात. त्याच परंपरेला अनुसरून यावर्षीच्या गुढीपाडव्यानंतर महत्त्वाचा सण आलाय तो म्हणजे वटपौर्णिमेचा. हिंदी चित्रपट-मालिकांमध्ये जशी करवाचौंथची महती असते तशी आपल्या मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी नवरा-बायकोमधील प्रेमाचे नाते सिध्द करण्यासाठी वटपौर्णिमेचे फार महत्त्व आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत वटपौर्णिमा आली की हातात पूजेचे ताट घेऊन सासूबाईंबरोबर वडाच्या झाडाकडे निघालेली नायिका आणि मग वडाला सुताचा धागा बांधून फेऱ्या घालणाऱ्या बायका हे चित्र हटकून दिसायचे. आता मात्र जवळपास प्रत्येक मालिका लग्नानंतर दुसऱ्याच कोणाबरोबर जुळलेले नायकाचे किंवा नायिकेचे प्रेमसंबंध, एकेका नायिकेपुढे विणलेली कटकारस्थानांची प्रेमजाळी, एकाच नायिकेसाठी लग्न होऊनही वाट पाहणारे तीन-तीन नायक अशा नाटय़मय वळणांवर दौडत आहेत. त्यामुळे नवरा-बायकोच्या प्रेमाशी जोडली गेलेली वटपौर्णिमा वाहिन्यांवरच्या मुख्य मालिकांमधून हद्दपार झाली आहे.
काळ बदलत चालला आहे. त्यामुळे मालिकांमधली सासू-सुनांमधली भांडणे जाऊन वेगळ्याच कथानकांनी प्रवेश केला आहे. मग यात आपल्या पत्नीचे दुसऱ्याबरोबर प्रेमप्रकरण आहे म्हणून सतत संशयाने वावरणारा नवरा आहे, आपल्याच मोठय़ा जावेचे कौडकौतुक होते म्हणून तिचा जळफ ळाट करत कटकारस्थान रचणारी नायिका आहे, कोणी आपल्याला संपत्ती मिळत नाही म्हणून कटाकारस्थान रचतं आहे तर कोणाला आपल्या सासूचे घरावरचे वर्चस्व नको म्हणून भानगडी रचतंय..अशा सगळ्या क थानकांमध्ये जिथे (तथाकथित) प्रेक्षकांना हवे असणारे नाटय़ आहे तिथे आपल्या नवऱ्यासाठी उदंड आयुष्य मागणाऱ्या, त्याच्यासाठी व्रत ठेवणाऱ्या हजारो वर्षांपूर्वीपासून चालत आलेल्या वटपौर्णिमेच्या प्रथेसाठी जागाच उरलेली नाही. त्यामुळे मालिके च्या निर्माता-दिग्दर्शक आणि लेखक मंडळींनी सध्या तरी कथानकात बसत नाही, या कारणाचा आधार घेत वटपौर्णिमेच्या प्रथेला फाटा दिला आहे. तर काहींनी आमच्या नायिका पुढारलेल्या आहेत. आजच्या काळातील असल्याने त्यांना या प्रथेत गुंतवणे चुकीचे ठरेल, असे वाटल्याने त्याचा विचारच दूर ठेवला आहे.
वटपौर्णिमेचे बदलते संदर्भ
काही मोजक्या मालिकांमधून या प्रथेचे आजच्या काळातील बदलते संदर्भ पहायला मिळणार आहेत. ते किती चांगले आणि त्यात खरेपणा किती?, याचा फारसा विचार न करता निदान अंधानुकरण करण्यापेक्षा त्याच्यावर लेखकांनी काही वेगळा विचार मांडला आहे हेही नसे थोडके. मुळात ज्या मालिकांमध्ये मोठी कुटंब आहेत त्यांनी वटपौर्णिमा हा घरातल्यांना एकत्र आणणारा दुवा म्हणून वेगळ्या अर्थाने साजरी करण्याचे ठरवले आहे. यात झी मराठीवरच्या ‘मला सासू हवी’ या मालिकेत तिन्ही सूना आणि सासू या भांडततंटत जशा एकत्र येतात त्याचपध्दतीने वटपौर्णिमेचे व्रत पूर्ण करताना दिसणार आहेत. तर स्टार प्रवाहच्या ‘आंबट गोड’ मालिकेतील दया, क्षमा, शांति या तिघींनी एकत्र येऊन नवऱ्यांनाही वटपौर्णिमेच्या दिवशी नुसता उपवास करायला नव्हे तर वडाची पुजा करून जन्मोजन्मी हीच पत्नी मिळावी, असे म्हणायलाही भाग पाडले आहे. प्रत्यक्षात एरव्ही वडाला धागा बांधून आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या बायकांची थट्टा करणाऱ्या नवरेमंडळींची पूजा करताना, व्रत ठेवताना कशी तारांबळ उडते हे आम्ही दाखवले, असे दिग्दर्शक निरंजन पत्की यांनी सांगितले. तर ईटीव्ही मराठीवरच्या ‘एक मोहोर अबोल’ मालिकेत चक्क भैरव आपल्या गेलेल्या पत्नीच्या आठवणीत वडाची पूजा करताना दिसणार आहे. वटपौर्णिमेची प्रथा जशीच्या तशी दाखवणे आम्हाला योग्य वाटत नाही. त्यापेक्षा या प्रथेमागचा जो विचार आहे तो आजच्या काळाला अनुसरून कसा दाखवता येईल, हे मांडणे महत्त्वाचे वाटत असल्याचे दिग्दर्शकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2013 5:21 am

Web Title: banyan full moon night missing in love affairs
Next Stories
1 क्षण आला भाग्याचा..
2 जाहिरातीतली ‘प्रचीती’
3 आधुनिक अनोखी प्रेमकथा
Just Now!
X