राज्यात डान्स बारवर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठविल्याचा मुद्दा सध्या गाजत असताना इकडे सोलापुरात आर्केस्ट्रा बारमधील एका बारबालेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली. घटनेनंतर पलायन केलेल्या बारबालाला व तिच्या प्रियकराला दौंड येथे सोलापूर तालुका पोलिसांनी अटक केली.
रिना ऊर्फ किरण व्हिक्टर इमिलियस (वय २४) व तिचा प्रियकर उस्मान मलिकसाहेब बागवान (रा. गाणगापूर स्टेशन, जि. गुलबर्गा) अशी अटक करण्यात आलेल्या प्रेयसी व प्रियकराची नावे आहेत. मोबाइलच्या लोकेशनवरून पोलिसांनी या दोघांचा छडा लावला.
हैदराबाद रस्त्यावर मुळेगाव शिवारात राजश्री आर्केस्ट्रा बार (पूर्वीचा डान्स बार) सुरू असून यात रिना ऊर्फ किरण (मुळ रा. कोलकाता) ही गायिका म्हणून सेवेत असताना तिची गुलबर्गा जिल्ह्य़ातील गाणगापूर येथील उस्मान बागवान नावाच्या तरूणाबरोबर ओळख होऊन त्याचे रूपांतर प्रेमात झाले. रिना ही आपला पती व्हिक्टर (वय ३०), चिमुकली मुलगी राणी (वय १ वर्ष ८ महिने) व दीर जॉन याच्यासह मुळेगाव तांडय़ावर स्वामी विवेकानंद नगरात राहत असे. किरण ही पहाटे आर्केस्ट्रा बार बंद झाल्यानंतर घरी परतली. तिच्या पाठोपाठ उस्मान व त्याचे दोघे साथीदार तिच्या घरात आले. उस्मान याने रिना ऊर्फ किरण हिच्या पतीला-व्हिक्टर यास, किरण हिच्याशी माझे प्रेमसंबंध असून मी तिला घेऊन जाणार आहे, तू अडविले तर तुला खलास करीन, अशी धमकी दिली. त्याचवेळी उस्मान याने व्हिक्टर याच्या तोंडावर रूमाल बांधला तर किरण व अन्य एका साथीदाराने त्याचे हात पकडले व दुसऱ्याने पाय धरले. तेव्हा उस्मान याने आपल्या कंबरेला असलेल्या गुप्तीने व्हिक्टरच्या गळ्यावर गंभीर वार करून त्याचा निर्घृण खून केला. नंतर मृतदेह घराबाहेर नेऊन केत यांच्या शेतावरील बांधावर टाकला व घरातील सांडलेले रक्त पुसण्यात आले. मृत व्हिक्टरचा मावसभाऊ जॉन याने दिलेल्या फिर्यादीनुसार सोलापूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
घटना घडल्यानंतर किरण व उस्मान हे दोघे फरारी झाले होते. त्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांची दोन पथके सक्रिय झाली होती. दरम्यान, किरण व उस्मान हे दोघे पुण्यात असून ते कोलकाता येथे जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यासाठी मोबाइल लोकेशनचा धागा महत्त्वाचा ठरला. कोलकाता येथे जाण्यासाठी हे दोघे दाैंड येथे रेल्वे स्थानकावर आल्याची माहती मिळताच तेथे पोहोचलेल्या पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अन्य दोघा साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. किरण व उस्मान यांच्या अटकेच्या कारवाईत सहायक फौजदार शिवाजी घोळवे, हवालदार नीलकंठ जाधवर, शिरीशकुमार सोनवणे, पोलीस नाईक प्रकाश कारटकर, संतोष देवकर, दयानंद हेंबाडे यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवप्रकाश यादव करीत आहेत.