पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि वारंवार भेडसावणारी दुष्काळी स्थिती यावर मात करण्यासाठी टंचाईचा सामना करणाऱ्या येवला तालुक्यात महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानाची यशस्वी अंमलबजावणी सुरू असून, या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसांत सुमारे पाचशे एकर कातळ जमीन नापीकची सुपीक झाल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.
कमी पाऊस आणि कमी पीक उत्पादन असणाऱ्या तालुक्यांना राज्य शासनाने यंदा टंचाई कामांसाठी ७५ लाखांचा निधी जलसंधारण उपाययोजनांसाठी उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून सुमारे २०० लहान-मोठी कामे सुरू असून त्याचे दृश्य परिणाम आगामी काळात निश्चितपणे पाहावयास मिळतील, असा विश्वास या भागातील लोकप्रतिनिधी व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत येवला तालुक्यात अनेक गावांत लोकसहभागाद्वारे कामे सुरू आहेत. पारंपरिक मृदसंधारण पद्धतीने एक टीएमसी पाणी अडविण्यासाठी सुमारे ७५ ते ८० हजार रुपये खर्च येतो, तर शासनाच्या या अभियानातील लोकसहभागामुळे हेच काम १० ते १२ हजार रुपयांत म्हणजेच आठ ते दहा पट कमी खर्चात होत आहे. या उपक्रमात निघणाऱ्या गाळावर रॉयल्टी लागत नसल्याने तो गाळ शेतकरी स्वत: आपापल्या शेतात टाकत आहेत. गाळ काढण्यासाठी शासनामार्फत जेसीबीसाठी लागणाऱ्या डिझेलचा खर्च दिला जातो. यामुळे कमी प्रतीच्या खडकाळ शेतजमिनीवर जलसंधारण क्षमता वाढत आहे. एक हेक्टर पडीक जमिनीवर ढोबळमानाने सरासरी ३०० ट्रॅक्टर गाळ बसतो. यामुळे या जमिनीत पाणी साठविण्याची क्षमता वाढते. तसेच शेतजमिनीची सुपीकता वाढत आहे, असे तालुका कृषी अधिकारी अशोक कुळधर यांनी सांगितले.
या अभियानात गाळ काढणे, जुन्या बांधाची दुरुस्ती करणे, खोल सलग समतल चर खोदणे, विशिष्ट पुनर्भरण, वनराई बंधारे आदी कामे केली जात आहेत. या अभियानातून येवला तालुक्यात १४० ठिकाणी गाळ काढणे, १५ ठिकाणी फूट तूट दुरुस्ती, आठ ठिकाणी खोल सलग समतल चर, तर ३७ ठिकाणी विहीर पुनर्भरण अशी २०० कामे प्रस्तावित आहेत. सद्य:स्थितीत पाच लाख २८ हजार घनमीटर गाळाचा उपसा झाला असून तीन कोटी ६५ लाख रुपये मूल्याची कामे झाली आहेत.
यामुळे ३६५ हेक्टर क्षेत्र सुधारले असून गाळ काढल्यामुळे ५४० हजार घनमीटर जलसाठा वाढला आहे. त्यामुळे सुमारे २०० हेक्टर सिंचन क्षेत्र वाढले आहे. अडविलेल्या पाण्याचे मूल्य चार कोटी दहा लाख रुपये असेल, असेही कुळधर यांनी सांगितले. तालुक्यात पंधरा जुन्या उपचाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली असून, १९ लाख रुपये खर्च दुरुस्ती कामांवर झाला आहे. १६० टीएमसी जलसाठा दुरुस्तीमुळे वाढला आहे, तर १६० हेक्टर सिंचन क्षमता वाढली आहे. आतापर्यंत येवला तालुक्यात एकूण ५८ लाख ६० हजार रुपये खर्च झाला असून, ५२५ हेक्टर क्षेत्र सुधारले आहे. त्यामुळे ७०० टीएमसी पाणी अडविले जाणार असून चार कोटी ९३ लाख रुपयांची कामे झाली आहेत. भुजबळ फाऊंडेशनतर्फे सुरू असलेल्या पाणी अडवा, पाणी जिरवा मोहिमेतून जळगाव नेऊर येथील २८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.