शहरातील हिरवाईच्या जतनासाठी ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमसारख्या (जीपीएस) नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग प्रथमच केला जात असला तरी या यंत्रासह खासगी संस्थांच्या आवारातील वृक्षांची मोजणी करण्यासाठी परवानगी देण्याघेण्याचा ताप वृक्षगणनेसाठी काम करत असलेल्या गटाला होत आहे. त्यामुळेच वृक्षगणना सुरू होऊन चार महिने होत आले असताना केवळ एक लाख वृक्षांची मोजणी पूर्ण झाली आहे. त्यातच पावसात जीपीएस यंत्र वापरण्याची समस्या असल्याने उर्वरीत वीस लाखांहून अधिक वृक्षांची गणना मुदतीत पूर्ण होऊ शकेल का, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
सहा वर्षांनंतर होत असलेली वृक्षगणना ४ फेब्रुवारी रोजी ए वॉर्डमधून सुरू करण्यात आली. यावेळी वृक्षाचे नाव, प्रजाती, उंची, घेर यांच्यासोबतच त्याचे स्थानही नोंदवण्यात येत आहे. त्यासाठी जीपीएस तंत्राचा उपयोग होत आहे. रस्त्यावरील तसेच सार्वजनिक ठिकाणांवरील वृक्षगणना झटपट होत असली तरी या यंत्रासह खासगी संस्थांच्या आवारात प्रवेश करण्यासाठी संबंधित सुरक्षा अधिकारी नन्नाचा पाढा वाचतात. वृक्षगणना बंधनकारक असली तरी ती करण्यासाठी लेखी परवानगीसाठीच बराच वेळ जातो. त्यामुळे आतापर्यंत केवळ १ लाख १२ हजार ६०४  झाडांची नोंदणी होऊ शकली आहे.
यापूर्वी २००८ मध्ये करण्यात आलेल्या वृक्षगणनेत मुंबईत १९ लाख १७ हजार ८४४ झाडे मोजण्यात आली होती. त्यातील ३,७७,५५५ झाडे सरकारी जमिनीवर, १,५८,९१० झाडे रस्त्यांवर, ५०,३२२ झाडे उद्यानांत, ७२,७२५ झाडे उद्योग परिसरात तर तब्बल १०,३८,६२९ झाडे खासगी जमिनीवर आढळली होती. त्यामुळे खासगी संस्थांकडून नाकारण्यात येत असलेल्या परवानगीचा मोठा फटका यावेळच्या वृक्षगणनेला बसत आहे. यावेळी झाडांच्या संख्येत किमान २५ टक्के वाढ असल्याची अपेक्षा पालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. मात्र आधीच धीम्या गतीने सुरू असलेल्या वृक्षगणनेला आता पावसाचाही फटका बसू शकेल. या गणनेसाठी वापरण्यात येणारी जीपीएस यंत्रे पावसात खराब होण्याची शक्यता आहे.
मात्र पावसात वृक्षगणना सुरूच ठेवण्याचा पालिकेचा विचार आहे. त्यामुळे ही यंत्रे सांभाळून वृक्षगणना करावी लागेल. ‘वृक्षगणना करण्यापेक्षाही परवानगी मिळवताना अधिक त्रास होतो. त्यातच आता पावसाळ्यात वृक्षगणना करताना जास्त त्रास होईल,’ असे वृक्षगणना करणाऱ्या गटातील एका सदस्याने सांगितले.

२० मेपर्यंतची वृक्षगणना
ए वॉर्ड – ४५,११७
बी वॉर्ड –  ४,६२२
सी वॉर्ड –  ५,५०७
डी वॉर्ड – २,१६२
पी उत्तर – ५५,१९६
एकूण – १,१२,६०४