महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी निघालेल्या बसवज्योती संदेश यात्रेचे सोलापुरात आगमन झाले. तेव्हा जिल्हाधिकारी गोकुळ मवारे यांच्यासह अनेकांनी या संदेश यात्रेचे स्वागत केले.
कर्नाटकातील बीदर जिल्ह्य़ातील भालकी येथून बसवज्योती संदेश यात्रा निघाली असून त्याचे अधिपत्य डॉ. बसवलिंग पट्टदेवरू हे करीत आहेत. या संदेश यात्रेचे सोलापुरात उत्साही वातावरणात आगमन झाले. जिल्हाधिकारी मवारे यांच्या हस्ते बसवेश्वर मूर्तीला पुष्पहार अर्पण करून संदेश यात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी बोलताना मवारे यांनी, महात्मा बसवेश्वरांचे प्रागतिक विचार आजही समाजाला दिशा देणारे असून त्यामुळे समाज व देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकेल, असे उद्गार काढले.
संदेश यात्रेचे प्रमुख डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी संदेश यात्रेची माहिती दिली. संतांची व हुतात्म्यांची पावन भूमी असलेल्या सोलापूर नगरीत आठवी बसव परिषद आयोजित करण्याचा मनोदयही त्यांनी बोलून दाखविला. बसवेश्वरांनी सांगितलेल्या इष्टलिंग, कायक, दासोह, अनुभव मंटप, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी केले. बसवेश्वरांनी वास्तव्य केलेल्या मंगळवेढय़ात त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा शासनाने केली असून त्यानुसार हे स्मारक उभारण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी केले.
रूपाभवानी मंदिर चौकात संदेश यात्रेचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी झुंबड उडाली होती. माजी आमदार विश्वनाथ चाकोते, प्राचार्य मोहन शेटे, डॉ. शिवमूर्ती शाहीर, आनंद मुस्तारे, तम्मा दर्गोपाटील, योगेश कुंदूर, जयराज नागणसुरे, बी. ए. मुल्ला, परमेश्वर माळगे, डॉ.राजेद्र गाजूल, संगीता भतगुणकी आदींचा त्यात समावेश होता. स्वागत व प्रास्ताविक काशीनाथ भतगुणकी यांनी केले.