शहरातील विविध भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स आणि महापालिकेकडे असताना नागरिकांकडून प्रति टँकर पैसे घेतले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली. पाण्याच्या प्रश्नावर सभागृहात मंगळवारी चांगलीच वादळी चर्चा झाली. पाण्यासारख्या प्रश्नावर सभेच्या शेवटी काँग्रेसचे सदस्य प्रफुल्ल गुडधे यांना बोलू न दिल्यामुळे काँग्रेसच्या सदस्यांनी सभागृहातून सभात्याग करून प्रशासनाचा निषेध केला.  
उन्हाळ्यामध्ये शहरातील विविध भागात निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची समस्या आणि ऑरेंज सिटी वर्क्‍सच्या मनमानी कारभारावर सत्तापक्षासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त करून आपपल्या भागातील समस्या मांडल्या. विषय पत्रिकेत आज पाण्याचा प्रश्न नसताना त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी बहुजन समाज पक्षाचे किशोर गजभिये आणि  विकास ठाकरे यांनी केल्यानंतर प्रारंभी विषय पत्रिकेवरील विषयावर चर्चा झाल्यानंतर पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली. आभा पांडे यांनी टॅंकर मागविण्यासाठी ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सकडून फ्लॅट धारकांना पैसे मागितले जात असल्याचा आरोप करून महापालिकेच्या टँकरचाी देयके सभागृहात सादर केली. या संदर्भात प्रफुल्ल गुडधे, विकास ठाकरे, आभा पांडे, प्रकाश गजभिये यांनी विचारणा केली. ज्या भागात पाणी मिळत नसेल तेथील नागरिकांनी टँकरची मागणी केली तर ऑरेंज सिटी वॉटर वर्क्सला कुठलेही शुल्क न घेता टँकर पाठविणे गरजे आहे आणि नॉन नेटवर्क भागात महापालिकेतर्फे टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. मात्र, ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍सतर्फे पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारीवरून सभागृहात त्या विषयावर चर्चा झाली.
सिव्हील लाईन भागात एका उत्कर्ष अपार्टमेंट हा प्रकार घडला असल्याचे आयुक्त आणि महापौरांच्या निर्दशनास आणून दिले. महापालिकतर्फे ओसीडब्ल्यू या कंपनीला कराराप्रमाणे पैसा दिला जात असताना त्यांना पैसे घेण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न सभागृहात उपस्थित केला. या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी प्रफुल्ल गुम्डधे, आभा पांडे यांनी केली. त्यावर महापौर यांनी आयुक्तांना सात दिवसात या संबंधी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.
शहरातील पाणी पुरवठा व्यवस्था सांभाळणाऱ्या आरेंज सिटी वॉटर वर्सने शहरातील विविध भागात रस्ते खोदून ठेवले असून पावसाळ्याच्या आधी दुरुस्ती केली नाही तर नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. दक्षिण नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्याची समस्या असून त्या संदर्भात ओसीडब्ल्यू गंभीर नाही. बाबुळबनमध्ये पाण्याच्या टाकीसाठी जागा उपलब्ध करून दिली असताना त्या ठिकाणी काम सुरू करण्यात आले नसल्याचे दुनेश्वर पेठे यांनी निर्दशनास आणून दिले. प्रशासनातर्फे काहीच प्रयत्न केले जात नसल्यामुळे त्या ठिकाणी काम लवकर सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आल्यानंतर एका आठवडय़ात काम सुरू करा, असे निर्देश महापौर सोले यांनी प्रशासनाला दिले.
सक्करदरा भागातील बुधवार बाजारातील पाण्याच्या टाकीचे काम अर्धवट स्थितीत आहे.  शहरातील विविध भागात पाणी पुरवठा अतिशय कमी दाबाने केला जात असून ऑरेंज सिटी वॉटर वर्क्‍स त्याबाबत गंभीर नाही. अधिकारी येऊन पाहणी करतात. तेवढय़ापुरते पाणी येते आणि दुसऱ्या दिवशी मात्र ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण होते त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. टिल्लू पंप जप्त करण्याबाबत चर्चा झाली. मात्र, बसपाचे मुरलीधर मेश्राम यांनी त्यास विरोध केला. ज्या ठिकाणी कमी दाबाने पुरवठा आहे त्या ठिकाणी टिल्लू पंपशिवाय पर्याय नाही त्यामुळे अशा ठिकाणी जप्तीची कारवाई करू नये, अशी मागणी मेश्राम यांनी केली. जवळपास दोन तास पाणी प्रश्नावर चर्चा होत असताना शहरातील पाणी व्यवस्थेसंदर्भात आयुक्तांनी तात्काळ ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी असे निर्देश महापौरांनी दिले.
  दरम्यान, सभागृहात प्रफुल्ल गुडधे पाण्याच्या प्रश्नावर बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यास सत्तापक्ष नेते प्रवीण दटके यांनी विरोध केला. त्यामुळे काही काळ गुडधे आणि दटके यांचा वाद चांगलाच रंगला आणि त्यात काँग्रेसचे सदस्य  सभागृहाबाहेर गेले.