मार्केटिंग फेडरेशनमार्फत राज्यातील २३ बाजार समित्यांत किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. बाजार समित्यांमधील धान्य खरेदी केंद्रांद्वारे १३ हजार ९४५ क्विंटल उडदाची (४ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने) खरेदी करण्यात आली. आधारभूत किंमत धान्य खरेदी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालास चांगला बाजारभाव मिळत आहे.
खरीप हंगामात केंद्रीय कृषी व सहकार विभागाने कृषीमाल किमान आधारभूत किमतीने खरेदी करण्याची योजना राबविण्यास नाफेड या संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली. नाफेडने महाराष्ट्र राज्य को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन या संस्थेची अभिकर्ता म्हणून नियुक्ती केली. उडीद, मूग, सोयाबीन या शेतीमालाची आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे, अशा बाजार समित्यांत किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्याच्या सूचना कृषी व पणनमंत्री यांनी दिल्या आहेत.
किमान आधारभूत किंमत धान्य खरेदी केंद्रावर पुरेशा प्रमाणात बारदाना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रविवारी सुटीच्या दिवशीही धान्य खरेदी केंद्रे सुरू राहतील, तसेच रोजच्या रोज केंद्रावर आलेल्या शेतमालाचे वजन करून शेतकऱ्यांना त्या बाबत पोहोच देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे फेडरेशनचे सरव्यवस्थापक दिलीप पाटील यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर आणलेल्या शेतमालाचे वजन कोणत्याही परिस्थितीत त्याच दिवशी होईल, याची फेडरेशनने दक्षता घेण्याची सूचना देण्यात आली आहे.