संक्रांतीनिमित्त पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात अपघात होऊन आनंदावर विरजण पडू नये म्हणून नागरिकांनी पतंग उडविताना सतर्कता बाळगाावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. विजेच्या तारामध्ये पतंग किंवा मांजा अडकून होणारे अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही महावितरणने म्हटले आहे.
सक्रांतीच्या सणानिमित्त पतंग उडविण्याला आणि उत्साहाला उधाण आले असते. मात्र, शहरी भागात वीज वितरणाच्या लघु व उच्च दाबाचे जाळे पसरले असते. अनेकदा पतंग या विजेच्या तारांवर किंवा खांबावर अडकतात व अशावेळी लोक अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी विजेच्या तारेला स्पर्श झाल्यास पतंग काढण्याचा हा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. अनेकदा अडकलेल्या पतंगांचा मांजा जमिनीवर लोंबकळत असतो व हा मांजा ओढून काढण्याच्या प्रयत्नात अपघात होण्याची शक्यता असते. अडकलेला किंवा लोंबकळणारा मांजा ओढून काढत असताना एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉर्ट सर्किट होण्याची, वीजपुरवठा खंडित होण्याची किंवा गंभीर अपघात होण्याची शक्यता असते.
पतंग उडविताणाचा आनंद घेत असतानाचा वीज तारांवर अडकलेला पतंग जीवघेणा ठरू शकतो, याचे भान नागरिकांनी ठेवावे, विजेच्या तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये, वीज तारांचे जाळे असलेल्या परिसरात शक्यतोवर पतंग उडवू नये, विजेच्या तारांमध्ये अडकलेला पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये तसेच पतंग उडविणाऱ्या लहान मुलांकडे पालकांनी लक्ष ठेवावे, अशा सूचना महावितरणने केल्या आहेत.