मुंबईत जागेला मोठीच किंमत आहे. ज्यांच्याकडे रिकामे किंवा अतिरिक्त घर आहे, ते उत्पन्नासाठी आपले घर भाडय़ाने देतात. भाडय़ापोटी मिळणाऱ्या भरघोस रकमेने त्यांची ‘चांदी’ होते. त्यासाठी ते कुणालाही घर भाडय़ाने देतात. आपल्याला दरमहा मिळणाऱ्या पैशांशी मतलब, अशीच त्यांची धारणा असते. पण याच भाडेकरूंचे उद्योग घरमालकासह अनेकांना अडचणीत आणत असतात.
ल्ल मुंबई उपनगरात राहणाऱ्या लतिकेश शुक्ला (नाव बदललेले) यांनी आपल्या घराच्या वरील खोली भाडय़ाने काही तरुणांना दिली होती. काही दिवसांनी त्या तरुणांनी शुक्ला यांच्या अल्पवयीन मुलीना फूस लावून पळवून नेले. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पण त्यांना या भाडेकरूच्या नावाव्यतिरिक्त काहीच माहिती नव्हती. जुजबी ओळखीवरून त्यांनी घर भाडय़ाने दिले होते. ते भाडेकरू तरुण गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे होते. त्यांनी भाडय़ाने घर घेतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत मुलीला पळवून नेले. पोलिसांनी अखेर आरोपींना पकडून मुलीची सुटका केली पण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता.. हे तरुण सराईत आरोपी होते. पण कसलीही खातरजमा न करता शुक्ला यांनी भाडय़ाने घर दिले आणि स्वत:च्या पायावर दगड मारून घेतला.
ल्ल मीरा रोडच्या नया नगर भागातून दहशतवाद विरोधी पथकाने अनेक दहशतवाद्यांना अटक केली. ते अशाच पद्धतीने भाडय़ाने फ्लॅट घेऊन राहत होते आणि त्यातून आपल्या योजना बनवत होते. अनोळखी व्यक्तींना भाडय़ाने घरे देताना खातरजमा न केल्यास किती गंभीर परिणाम होऊ शकतात, त्याची प्रचिती तेव्हा आली. तेव्हापासून भाडय़ाने घरे देताना पोलिसांना भाडेकरूंची माहिती देण्याचे फर्मान काढण्यात आले होते.
ल्ल अ‍ॅण्टॉप हिल येथे राहणाऱ्या एका घरमालकाने आपले घर एका जोडप्याला भाडय़ाने दिले होते. त्याला केवळ त्या माणसाचे नाव माहीत होते. त्या इसमाच्या पत्नीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा घरमालकाची पंचाईत झाली. तिच्या पतीचा मोबाईल क्रमांकही त्याच्याकडे नव्हता. त्यामुळे पुढे काय करायचे हा प्रश्न पडला आणि नंतर पोलिसांचा ससेमिरा त्याच्या मागे लागला तो वेगळा.
ल्ल वडाळा येथून एका गुंडाला पोलिसांना तडीपार केले होते. त्याचा परिसरात उपद्रव होता. पण या गुंडाने याच परिसरात दुसरे घर भाडय़ाने घेतले आणि तेथे राहू लागला. तेथे राहून त्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या. या दोन्ही प्रकरणांत वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी घरमालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
कसलीही खातरजमा न करता घर भाडय़ाने देणे हा मोठा निष्काळजीपणा आहे. एकीकडे आपण लोकांना दक्ष नागरिक बनविण्याची मोहीम राबिवतो आणि दुसरीकडे लोक असा निष्काळीजपणा करतात. अशापद्धताने भाडेकरूंची माहिती न देता घरं भाडय़ाने देणाऱ्या ७५ घर मालकांवर गेल्या दोन महिन्यात वडाळा ट्रक टर्मिनस पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नंतर त्यांना अटक केली जाते. देवनार पोलिसांनीही पाच घरमालकांवर गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास गरूड यांनी दिली.
घर भाडय़ाने घेणारा गरजू असतो. पण अनेकदा गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेत असतात. ते वर्षांचे भाडे आगाऊ देतात किंवा बाजारभावापेक्षा जास्त भाडे देऊन घर घेतात. त्यामुळे घरमालक त्या आमिषाला बळी पडतो. पण घरमालकाने भाडेकरूंची वैयक्तिक माहिती, त्याचे छायाचित्रे पोलिसांना दिले तर पुढील अनर्थ टळू शकतो असे पोलिसांना सांगितले. वारंवार आवाहन करूनही घरमालक अशा चूका करत असल्यानेमुंबई पोलिसांनी सध्या अशा घरमालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारायला सुरवात केली आहे.