रस्त्याच्या कामांमुळे रस्त्याचा भाग हा उंच झाला असून पदपथ आणि रस्त्याची उंची समान झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा कसा होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने नवी शक्कल लढवून पदपथाच्या पाण्याच्या निचऱ्यासाठी असलेल्या आउटलेटजवळ रस्त्यातील पाणी जाण्यासाठी खड्डे पाडून ठेवले आहे. मात्र या खड्डय़ांमुळे पादचाऱ्यांचे व वाहनचालकांना छोटय़ा-मोठय़ा अपघाताला  वारंवार समोरे जावे लागत आहे. या खड्डय़ांमुळे रस्त्याच्या कडेला चालताना ऐरोलीकरावंर खाली बघूनच चालण्याची वेळ आली आहे.
    ऐरोली सेक्टर दोनपासून सेक्टर चापर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम मागील वर्षांपासून सुरू आहे. यामुळे रस्त्याची उंची वाढली. रस्त्याच्या बाजूने असणारे पदपथ व गटाराची समान पातळी आली आहे. काही ठिकाणी पदपथ व गटार खाली रस्त्यावर अशी परिस्थिती आहे. त्यातच पदपथावर फेरीवाल्यांनी व दुकानदारांनी कब्जा केल्यामुळे नागरिकांना पदपथावरून न चालता रस्त्यावरूनच चालावे लागत आहे. पण मान्सूनमधील रस्त्यावर साचणारे पाणी जाण्यासाठी जागा नसल्यामुळे रस्त्यांना खड्डे पाडून पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची शक्कल अधिकाऱ्यांनी लढवली आहे. मात्र या खड्डय़ात पाय पडून कधी कोणी खाली कोसळेल याचा नेम नाही. तसेच दुचाकी रस्त्याच्याकडेला घेताना खड्डय़ात चाक अडकून चालक खाली पडेल याचादेखील नेम नाही.
या संदर्भात स्थनिक नगरसेवक मनोज हळदणकर म्हणाले की, रस्त्याचे काम सुरू असताना महानगरपालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक ती दक्षता घेतलेली नाही. मान्सूनमध्ये जर खड्डय़ामधून पाण्याचा निचरा नाही झाला तर ऐरोली सेक्टर तीन हा भाग खोलगट असल्यामुळे येथे पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने यावर तोडगा नाही काढला तर ऐरोली विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ऐरोली विभाग अधिकारी साहेबराव गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, महानगरपालिकेच्या अभियंत्यांना सोबत त्या ठिकाणाची पाहणी करून त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.  
नवी मुंबईत सोनसाखळी खेचण्याच्या घटना घडत असताना पोलीस प्रशासन पदपथावरून चालण्याची जनजागृती करते. पण पदपथावर फेरीवाल्यांनी बस्तान मांडून ठेवले आहे, तर रस्त्याच्या बाजूने खड्डे खोदून ठेवल्यामुळे रस्त्यावरूनच मार्ग काढत जावा लागत आहे. पावसाळयात जर खड्डय़ात पाणी भरल्यास आणि ते लक्षात न आल्यास अपघात होण्याची शक्यता आहे.
स्नेहल रोडे, नागरिक