दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर बनावट वस्तू आणि खाद्यपदार्थ बनविणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्याचबरोबर असे भेसळयुक्त खाद्यपदार्थ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने छापे घालायला सुरुवात केली असून भेसळयुक्त मावा, दूध, तेल आदी जप्त करण्यास सुरवात केली आहे.
तयार भेटवस्तूंची मुंबई ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. दिवाळीत इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून, कपडे आणि खेळणी भेटवस्तू म्हणून दिली जातात. गेल्या काही दिवसांत मुंबईतील अनेक बाजारांमध्ये बनावट उत्पादने दाखल झाली आहेत. छोटा भीम हे कार्टुन पात्र लहान मुलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. त्यामुळे त्याच्या छयााछित्रांचा आधार घेत मोठय़ा प्रमाणात खेळणी, टी शर्ट बाजारात आले आहेत. छोटा भीम मालिकेची निर्माती असलेल्या हैदराबादच्या ग्रीन फिल्ड या कंपनीकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने मनिष मार्केटमध्ये छापा घालून तब्बल २५ लाखांची बनावट छोटा भीमची उत्पादने जप्त केली. त्यात ७० हजार टी शर्टसचा समावेश होता. यावरून नकली उत्पादनांचा सुळसुळाट किती आहे, त्याची कल्पना येऊ शकेल. प्रख्यात कंपन्यांच्या बनावट इलेक्ट्रॉम्निक वस्तूही बाजारात आल्या आहेत. त्यात सोनी, सॅमसंग, नोकिया आदी कपंन्यांचे कॅमेरे आणि मोबाईलचा समावेश आहे.
 दिवाळी हा गोड पदार्थाचा सण. घरगुती फराळापेक्षा आता रेडिमेड फराळ, मिठाई देण्याचे प्रमाण वाढले आहे. मिठाईमध्ये मोठय़ा प्रमाणात भेसळ केली जाते ती मावा, तेल आणि दूधात. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने गेल्या महिन्यापासूनच  छापे घालण्यास सुरवात केली आहे. अन्य राज्यांतून येणारा मावा, तेल आदींवर लक्ष ठेवण्यासाठी खास पथक तयार केले असून ते विविध स्थानकांवर आणि दुकानांवर लक्ष ठेवून आहे, असे अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त सुरेश अन्नापुरे यांनी सांगितले.
भेसळयुक्त दूध विक्रीच्या टोळ्याही सक्रीय झाल्या असून त्यांच्यावरही कारवाई सुरू झालेली आहे. बोरिवली आणि दादर येथे छापा घालून दुधात भेसळ करणाऱ्या आरोपींना अटक करून लाखो रुपयांचे भेसळयुक्त दूध जप्त केल्याचे उपायुक्त चौगुले यांनी सांगितले. तर मागील आठवडय़ातच ६३८ किलो भेसळयुक्त मावा जप्त केल्याची माहिती त्यांनी दिली. सुटय़ा तेलातही भेसळ होते त्यामुळे अशा सुटय़ा तेलाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु अनेक ठिकाणी सुटे तेल विक्री होत असते. बुधवारीही अन्न औषध प्रशासनाने भायखळा येथील एका दुकानात छापा घालून १२ हजार लिटर सुटे तेल जप्त करण्यात आले आहे.
नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट उत्पादेही बाजारात आली आहेत. ते शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. भेसळयुक्त आणि हलक्या दर्जाच्या माव्या आणि दूधापासून बनवलेली मिठाई आरोग्याला अपायकारक असते. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.