अतिदुर्गम अशा धानोरा तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली आहे. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्याची वागणूक देऊन उत्तम सेवा प्रदान करावी, असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
धानोरा येथे २ कोटी १३ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे गृहमंत्री, तसेच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री आर.आर. पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, विभागीय आयुक्त डॉ. बी.व्ही. गोपालरेड्डी, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूपेश जयवंशी, पंचायत समितीच्या सभापती कल्पना वड्डे, अतिरिक्त जिल्हाधिकारी नीलेश गटणे उपस्थित होते.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, जिल्ह्य़ात अधिकारी व कर्मचारी उत्तमरीत्या योजना पोहोचविण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कामाला गती देण्यासाठी जिल्ह्य़ातील तलाठी व महसूल मंडल कार्यालयात ४० इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. तहसील कार्यालयांमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्यात यावे. अनेक दिवसांपासून जिल्ह्य़ातील निर्वासित बंगाली बांधवांचे वर्ग २ ची जमीन वर्ग १ मध्ये करण्याची मागणी असून त्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
यावेळी आर.आर. पाटील म्हणाले की, महसूल विभागाने आतापर्यंत ३० हजार वन जमिनींचे पट्टे लाभार्थीना वाटप केले आहे. जिल्हा विकास कामामध्ये मागे राहू नये, यासाठी ४० ठिकाणी तलाठी महसूल मंडळ कार्यालय बांधण्यासाठी १५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून आतापर्यंत ८५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. अपूर्ण कामे पार पाडण्यासाठी उर्वरित १०६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले तर अपूर्ण कामे पूर्ण करण्यास मदत होईल. या जिल्ह्य़ातील खनिज संपत्ती बाहेर जाऊ नये म्हणून यापूर्वी देण्यात आलेले खनिज पट्टे रद्द करण्यात यावे व येथेच प्रकल्प राबविण्यात यावे, असेही ते म्हणाले.भाग्यश्री आत्राम आणि आमदार डॉ. उसेंडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महसूल मंत्र्यांच्या हस्ते कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमला विश्वनाथ पदा, सायत्रा मोहुर्ले मोहली यांना २० हजारांचा धनादेश देण्यात आला. ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी केले. प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी किरण कुळकर्णी यांनी, तर आभार तहसीलदार मल्लीक विरामी यांनी मानले.
८० टक्के शेतकऱ्यांना कर्ज द्या -आर.आर.
गडचिरोली जिल्ह्य़ातील ८० टक्के शेतकऱ्यांना बँकांनी कर्ज पुरवठा करावा, जेणेकरून सावकाराकडे शेतकऱ्यांना जाण्याची परिस्थिती उद्भवू नये. कर्जाचे वितरण शेतीच्या मशागतीच्या पूर्वीच करण्यात यावे, अशा सूचना गृहमंत्री व पालकमंत्री आर.आर. पाटील यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहातील जिल्हा नियोजक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत प्रथम खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी खते, बी-बियाणे, कीटकनाशके इत्यादींचा पुरवठा करण्यासाठी तालुकास्तरावर नियोजन करण्यात यावे, अशाही सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कृषी विभागामार्फत भात, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांच्या वाढीसाठी केलेल्या उपाययोजनांविषयी माहिती विशद करण्यात आली.