निसर्गाने अत्यंत संवेदनशीलपणे ज्या गोष्टींची निर्मिती केली असेल तर ती स्त्री आहे. प्रत्येक क्षेत्रात सक्षमपणे आपलं अस्तित्व सिद्ध करणा-या आपल्यामधील स्त्रीत्वाला कमी लेखू नका, तर स्त्री असल्याचा अभिमान बाळगा, असे मत ‘होणार सून मी..’ मालिका फेम तेजश्री प्रधान यांनी व्यक्त केले.
भागीरथी महिला संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य झिम्मा-फुगडीच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी अखिल भारतीय महिला फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी अरुंधती महाडिक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा तेजश्री प्रधान यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक उपस्थित होते.
पॅव्हेलियन हॉटेल येथे या स्पर्धा मोठय़ा प्रमाणात आणि प्रचंड उत्साहात पार पडल्या. जिल्हा आणि जिल्हय़ाबाहेरील ५००हून अधिक महिला संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. हॉटेलच्या आवारातील पार्किंग, मधुसूदन हॉल, पॅव्हेलियन कॉन्फरन्स हॉल, गॅलरी, टेरेस, गार्डन अशा सर्व ठिकाणी या स्पर्धा सुरू होत्या. मोकळय़ा जागेवर भव्य मंडप घालून झिम्मा-फुगडीसाठी महिलांनी फेर धरला होता.
या स्पर्धेत झिम्मा-फुगडी, छिया-फुई, सूप नाचविणे, काठवटकाणा, घागर घुमवणे, जात्यावरील ओव्या, उखाणे, घांडा घोडा अशा अनेक गौराईच्या खेळांचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणासह महिलांनी घातलेले दागिने, त्यांची वेशभूषा, काही वैशिष्टय़पूर्ण प्रकार, वेगळय़ा प्रकारची गाणी यावर गुणानुक्रम आधारलेला होता. घागर घुमू दे.. रामा पावा वाजू दे, दही वडा.. बटाटा बडा.., घोडय़ावरून आली नवरदेवाची स्वारी अशा अनेक गाण्यांनी संपूर्ण हॉटेल परिसर दणाणून गेला होता. फुलांनी सजवलेल्या घागरी, छान रंगकाम केलेली सूप, आकर्षक रंगांत सजवलेले जाते आणि विविध रंगांत नऊवारी परिधान केलेल्या गौराई मोठय़ा उत्स्फूर्तपणे आपल्या खेळांचे सादरीकरण करत होत्या.