महागाई, भ्रष्टाचार, सीमेवरील असुरक्षितता यामुळे सामान्य लोक त्रस्त असून ते व्यवस्था परिवर्तन आणू इच्छितात. आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेऊन सत्तेत परिवर्तन आणण्यासाठी सर्वानी सज्ज राहण्याचे आवाहन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय सह सरकार्यवाह के. सी. कन्नन यांनी केले.
रा. स्व. संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त ते प्रमुख वक्ते म्हणून लातुरात बोलत होते. रविवारी सकाळी शहरातील व्यंकटेश विद्यालयाच्या प्रांगणातून गावभागात संघाचे दरवर्षीप्रमाणे पारंपरिक संचलन झाले. त्यानंतर शस्त्रपूजनाचा कार्यक्रम झाला. कन्नन यांनी सुमारे तासभराच्या आपल्या भाषणात केंद्र सरकारच्या लोकविन्मुख कारभारावर सडकून टीका केली. व्यासपीठावर रा. स्व. संघाचे क्षेत्रीय संघचालक डॉ. अशोक कुकडे, शहर संघचालक बालाप्रसाद बाहेती, प्रमुख पाहुणे प्रा. मनोहर कबाडे, शहर सह संघचालक विनोद कुचेरिया उपस्थित होते.
कन्नन म्हणाले, राष्ट्राचा स्वाभिमान देशात पाळला जात नाही. पाकिस्तानचे सनिक सीमेवर सातत्याने घुसखोरी करत आहेत. भारतीय सनिकांचा शिरच्छेद केला जातो, तरीही आपल्या देशाचे पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चा करतात व त्याच वेळी पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या देशच्या पंतप्रधानांना हिणवतात. एक राष्ट्र म्हणून ही अतिशय मनाला क्लेश देणारी घटना असल्याचे ते म्हणाले. देशाच्या कारभारावर सामान्य जनतेत प्रचंड नाराजी आहे. जनता आता परिवर्तन आणू इच्छिते आहे. हे परिवर्तन सर्वच बाबतीत जनतेला अपेक्षित असून निर्णय घेणारी व्यक्ती सत्तेत असली पाहिजे, असे लोकांना वाटते. देशाला एका चांगल्या वळणावर नेणारे नेतृत्व हवे. आगामी लोकसभा निवडणुकीत सत्तेत परिवर्तन आणण्यासाठी जागरूक स्वयंसेवकांनी आपली भूमिका वठवली पाहिजे. मतदारयादीत स्वतचे नाव नोंदवले नसेल तर ते नोंदवा, आपल्या वस्तीतील लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा, देशात परिवर्तन आले तरच आपला देश वाचणार आहे, हे लक्षात ठेवा. या परिवर्तनातूनच देश परमवैभवाप्रत जाईल हे लक्षात असू द्या, असे आवाहन त्यांनी केले.
जगातील ३५ देशांत संघाचे काम कसे गतिमान आहे हे सांगून कन्नन म्हणाले, चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे. त्या देशात कामगार चळवळी मोठय़ा आहेत. मात्र राष्ट्रीयतेच्या आधारावर कामगार संघटना कशी चालवावी यासाठी तेथे प्रशिक्षणवर्ग घेतले जातात व त्या वर्गात रा. स्व. संघाचे प्रचारक मार्गदर्शन करतात. संघ आता जागतिक पातळीवर आपले कर्तव्य पार पाडत असल्याचे ते म्हणाले. देशाची आíथक स्थिती सध्या प्रचंड संकटात आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत घसरतो आहे. भ्रष्टाचार पराकोटीला गेला आहे. हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतेही उपाय केले जात नाहीत. ग्रामीण भागातील सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे शहराकडे लोक मोठय़ा संख्येने धाव घेत आहेत. ग्रामीण भागातील लोक ज्या कारणासाठी शहराकडे येतात, शिक्षण, आरोग्य, प्राथमिक सुविधा या शहराप्रमाणेच ग्रामीण भागात मिळाल्या पाहिजेत. संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता असलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. विकासाच्या नावावर जो ग्रामीण भागाचा विनाश होतो आहे, तो त्वरित थांबवला पाहिजे. खेडोपाडी इंग्लिश शिक्षणाचे पेव उठले आहे. आम्ही इंग्लिशच्या विरोधात नाही. मात्र एखाद्या भाषेबरोबरच त्या भाषेची संस्कृतीही तिच्या सोबत येते, हे लक्षात ठेवा. सभ्यता, संस्कृती व संस्कार याकडे लक्ष द्या. अंधानुकरण टाळा, असे आवाहनही त्यांनी केले.
या देशातील कुटुंब व्यवस्थेला हजारो वर्षांची परंपरा आहे. आता ही कुटुंब व्यवस्थाच मूल्यहीन करण्याचे डावपेच खेळले जात आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जमिनीवरील व सागरी सीमा असुरक्षित आहेत. सत्तेतील मंडळी या प्रश्नासंबंधी अजिबात जागरूक नाही, प्रश्न सोडवण्याकडे त्यांचा कल नाही. त्यामुळेच सामान्य जनता परिवर्तनाच्या प्रतीक्षेत असून सीमोल्लंघनाच्या दिवशी सर्वानी परिवर्तनासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
 

 

 

 

———