गांडूळखत प्रकल्पाच्या वादातून मिरज तालुक्यातील ढवळीच्या महिला सरपंचांना बेदम मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार शनिवारी रात्री व रविवारी सकाळी घडला असून, याप्रकरणी चार तरुणांना मिरज ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. जखमी महिला सरपंचांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.
    ढवळी येथील सरपंच रूपाली मारुती कोळी यांचे पती मारुती कोळी यांच्याकडे गांडूळखत प्रकल्पाच्या दर्जाबाबत विचारणा करण्यासाठी संदीप व्हनुरे हा आपले मित्र शरद कुगे (वय २६), बाहुबली अथणे (२१), सन्मती कुगे (२५), व बबन शेडबाळे असे पाच जण शनिवारी रात्री सरपंचांच्या घरी गेले होते. त्या वेळी त्यांचे पती घरी नव्हते. गांडूळखताचा दर्जा अयोग्य असल्याचे कारण पुढे करीत महिला सरपंचांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
    महिलेला रात्री मारहाण झाल्यानंतर आज रविवारी सकाळी संदीप व्हनुरे यांच्या घरी पती-पत्नी विचारणा करण्यास गेले असता पुन्हा मारहाण करण्यात आली. काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची तक्रार पाच जणांच्या विरुद्ध महिला सरपंचांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. बबन शेडबाळे अद्याप फरारी आहे.