ठाणे शहराप्रमाणे नवी मुंबईलाही तलावांची देणगी लाभली आहे. नवी मुंबईत काही तलावांची संख्या कमी करून ती २५ पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. महानगरपालिकेने तलाव व्हिजनअंतर्गत १८ तलावांचे सुशोभीकरण करताना गाळ काढणे, गॅबीयन भिंत, घाट, निर्माल्य कलश, स्वागत कमान यावर करोडो रुपये खर्च केले असून त्या तलावाचे देखभालीअभावी विद्रूपीकरण झाले आहे. तलावामध्ये बसवण्यात आलेली पाण्याची कारंजी ही केवळ दिखाव्यासाठी शिल्लकराहिली आहेत. ती बंद अवस्थेत आहेत. तलावामध्ये कपडे धुण्यास सक्त मनाई असतानाही रहिवाशी बिनधास्तपणे या ठिकाणी कपडे धूत असून तलावातील पाणी दूषित झाले आहे. तलावामध्ये कोणी पडू नये यासाठी सुरक्षा म्हणून लोखंडी पाइप तसेच राजस्थानी दगडाचे नक्षीकाम केलेल्या ग्रिल्स बसवण्यात आल्या आहेत; पण त्याचा वापर धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी करण्यात येत असल्याने कोटय़वधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे नवी मुंबईतील तलाव देखभाल आणि सुरक्षेअभावी धोबीघाट झाले आहेत.
तलावामध्ये गणपती व देवी मूर्ती विसर्जनासाठी वेगळा भाग काढण्यात आला असतानादेखील त्यामध्ये गणेश मूर्ती किंवा देवीच्या मूर्ती विसर्जित केल्या जात नाहीत. थेट चांगल्या पाण्यामध्येच मूर्ती विसर्जित केल्या जातात. निर्माल्य हे निर्माल्य कुंड किंवा कलशामध्ये न टाकता थेट पाण्यात टाकण्यात येते. महानगरपालिकेकडून तलाव वेळोवेळी साफ करण्यात येत नसल्याने तलावातील नितळ पाणी घाण झालेले आहे. काही ठिकाणी तलावाला सुरक्षारक्षक नसल्यामुळे लहान मुले बिनधास्तपणे पाण्यात पोहण्यासाठी जातात. त्यामुळे अनेक वेळा पाण्यामध्ये लहान मुले बुडण्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. शहराच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या या तलावांचे सुशोभीकरण करण्यासाठी पालिकेने २०११-१२ रोजी पाच कोटी ८५ लाख, तर त्यानंतर पाच कोटी २८ लाख रुपये खर्च केले आहेत. पालिकेने तलावांवर आतापर्यंत वीस कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली असून आता केवळ योग्य काळजी, देखभाल, दुरुस्ती, सुरक्षारक्षक न ठेवल्याने हे तलाव समस्यांची डबकी झाली आहेत.
ऐरोली नाक्यावरील गणपती तलावाला आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी धोबीघाटच बनवले आहे. तलावाच्या बाजूला बसवण्यात आलेल्या लोखंडी पाइपवर कपडे सुकण्यासाठी टाकण्यात येतात. तलावामधील प्रवेशद्वारावर कचरा साचला असून पाण्यावर कचऱ्याचा तवंग दिसून येत आहे. तलावांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. तलावाच्या बाजूने बसवलेले पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. नागरिकांना बसण्यासाठी बसवण्यात आलेली आसनव्यवस्थादेखील तुटलेल्या अवस्थेत आहे. दिघा येथील तलावामध्ये कारंजी बसवण्यात आली आहेत, पण ते बंद अवस्थेत धूळ खात पडलेले आहेत. तलावामध्ये कचऱ्याचा तवंग दिसून येत आहे. निर्माल्य कुंडामधील कचरा वेळेवर उचलण्यात येत नसल्याने त्यातून दरुगधी येत आहे. रबाले येथील राजीव गांधी तलावामध्ये बाजूला बसण्यासाठी असणारे बेंचेस तुटलेल्या अवस्थेत आहेत. तलावाला झोपडपट्टीने वेढले असल्याने त्या ठिकाणच्या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून कपडे धुण्यासाठी तलावाच्या पाण्यातील वापर करण्यात येतो, त्यामुळे हा तलाव धोबीघाटच बनला आहे. घणसोली तलावाच्या असणाऱ्या पदपथावर दुकानदारांनी मोडकळीस आलेले सामान ठेवले असल्याने तलावाच्या बाजूने चालताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तलावाच्या बाजूला असणाऱ्या उद्यानामध्ये जुगारी पत्ते खेळत बसलेले असतात. रात्रीच्या वेळी काही मद्यपी मद्यपान करतात, असे नर्मदा पाटील यांनी सांगितले. आंग्रोळी तलावाच्या बाजूने असणाऱ्या पदपथावरदेखील काही जुगारी पत्ते खेळत बसलेले असतात. येथून जाताना महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तलावातील पाणी स्वच्छ करण्यात येत नसल्यामुळे तलावातून दरुगधी येते. कोपरखरणे तलावामध्येदेखील तलावाच्या बाजूने सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या ग्रिल्स तुटलेल्या अवस्थेत आहेत. तलावाच्या बाजूने कचरा साचलेला आहे. तलावामध्ये कचऱ्याचा तवंग दिसून येत असून रासायनिक पाणी सोडण्यात येत असल्यामुळे तलाव प्रदूषित झाले आहे.

माझे शहर माझे मत : खेळाडूंकडे लक्ष द्यायला हवे
नवी मुंबईमध्ये उद्याने भरपूर आहेत, पण क्रीडाप्रेमींना खेळण्यासाठी मैदांनाची कमतरता आहे. जी मैदाने आहेत, त्या ठिकाणी डेब्रिजचे ढीग पडलेले असल्याने मैदानांची दुर्दशा झाली आहे. या मैदानाकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. मैदानामध्ये वाहने पार्किंग करण्यात येत असल्याने खेळण्यासाठी जागा मिळत नाही. तसेच राजकीय नेते स्वत:च्या प्रसिद्धीसाठी मैदानामध्ये कार्यक्रम आयोजित करत असल्यामुळे खेळाडूंनी खेळायचे कुठे असा प्रश्न पडतो.
– विनायक पेंढणेकर

भिकाऱ्यांची वर्दळ
नवी मुंबईतील रेल्वे, बस स्थानक, सिग्नल, प्रार्थना स्थळाच्या बाहेर, मार्केटमध्ये भिकाऱ्यांची वर्दळ वाढत चालली आहे. या भिकाऱ्यांना पैसे दिले नाही तर त्यांच्याकडून शिवीगाळदेखील केली जाते. नागरिकांच्या हातातील वस्तू ओढून घेण्यापर्यंत या भिकाऱ्यांची मजल जाते. त्यामुळे या भिकाऱ्यांवर प्रशासनाने काही तरी उपाययोजना करायला हवी, असे वाटते.
– विशाखा वटकर

स्वच्छतेसाठी उपाययोजना जरुरीची
नवी मुंबईतील कचराकुंडय़ा ओसांडून वाहत आहेत. कचरा रस्त्यावरदेखील येऊन पडलेला असतो. भटकी कुत्री हा कचरा अस्ताव्यस्त करत असतात. वेळेत कचरा उचलण्यात येत नसल्यामुळे कचरा सडून त्यातून दुर्गधी येते. त्यामुळे मच्छर, माश्या, चिलटे यांचा त्रास सहन करावा लागतो. प्रशासनाने शहारातील स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. – रामेश्वर काकडे

विजेची बचत करायला हवी
शहरातील शासकीय कार्यालयांमध्ये आवश्यक नसताना एसी, पंखे, दिवे यांचा वापर होत असतो. तसेच दिवसाही रस्त्यावरील पथदिवे सुरू असतात.ो विजेचा वापर आवश्यक तेवढाच करणे जरुरीचे आहे. परंतु तसे होत नाही. ज्या ठिकाणी अंधाराचे साम्राज्य असते, त्या ठिकाणी विद्युत दिवे बसवणे गरजेचे आहे.  
– अमय कुलकर्णी

ग्रंथालयांची संख्या वाढवावी
शहरामध्ये ग्रंथालयांची व अभ्यासिकांची कमतरता आहे. वाचनसंस्कृती वाढीस लागण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नोडमध्ये ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिकेची स्थापना होणे आवश्यक  आहे. पालिकेच्या माध्यमातून विविध विषयांवर विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळेल.  – चाँद शेख