शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रशस्ती
मराठी भावगीतांना प्रदीर्घ परंपरा असून श्रीधरच्या योगदानामुळे ही परंपरा अधिक समृद्ध झाली आहे, अशी प्रशस्ती शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी रविवारी येथे दिली. ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि संगीतकार श्रीधर फडके यांच्या ‘साकार गंधार हा’ या ध्वनिफितीचे प्रकाशन बाबासाहेबांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर श्रीधर फडके, प्रा. वीणा देव, कवी प्रवीण दवणे, व्हीएसएस मल्टिमीडियाचे वीरेंद्र उपाध्ये, ‘लोकसत्ता’चे वरिष्ठ उपसंपादक अनिरुद्ध भातखंडे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव आशा भोसले या कार्यक्रमास उपस्थित राहू शकल्या नाहीत.
१९३५ मध्ये आलेल्या प्रभातच्या ‘माझा मुलगा’ या चित्रपटात शांताराम आठवले व केशवराव भोळे या गीतकार-संगीतकाराच्या जोडीने भावगीतांच्या वळणाची गाणी दिल्याचे मला आठवते. त्यानंतरच्या काळात सुधीर फडके, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, गजानन वाटवे, यशवंत देव अशा अनेक कलाकारांनी ही परंपरा जोपासली. सध्या संगीताची परिभाषा बदलली असली तरी श्रीधरने सातत्याने उत्तमोत्तम गाणी देत ही परंपरा अधिक समृद्ध केली आहे, असे गौरवोद्गार बाबासाहेबांनी काढले.
‘ऋतू हिरवा’चे प्रकाशन बाबूजींच्या हस्ते झाले होते. आज ते असते तर या ध्वनिफितीचे प्रकाशनही त्यांनीच केले असते, मात्र बाबासाहेबांच्या उपस्थितीमुळे ती उणीव भरून निघाली, असे भावपूर्ण मनोगत श्रीधर फडके यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्हीएसएसचे वीरेंद्र उपाध्ये यांनी केले.
 समीरा गुजर आणि वरुण उपाध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संवेदना आर्ट्सचे संतोष जोशी यांनी या सोहळ्याचे दिमाखदार आयोजन केले होते. रसिकांच्या तुडुंब गर्दीत झालेल्या या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्टय़ ठरले ते म्हणजे प्रसिद्ध नृत्यांगना कीर्ती भवाळकर व त्यांच्या शिष्यांनी सादर केलेली नृत्ये! या ध्वनिफितीतील ‘साकार गंधार हा’ आणि ‘भुलवी तनमन’ या दोन गाण्यांवरील नृत्याविष्काराने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. श्रीधर फडके यांनी ‘रुतत चालले मिळामिळाने’ हे गाणे आर्त स्वरात सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. प्रा. वीणा देव, कवी प्रवीण दवणे आणि अनिरुद्ध भातखंडे यांनी या ध्वनिफितीतील काव्य व संगीताचे रसग्रहण केले.