शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांपूर्वी जन्मलेल्या एका बालकाचा मृत्यू झाल्याची घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बालकाच्या वडिलांनी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय अधिक्षकांकडे केली आहे.
तालुक्यातील किन्हवली परिसरातील खरपत येथील दौलत शिंदे यांनी त्यांच्या चार दिवसांच्या बाळाला २० नोव्हेंबर रोजी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.
 दुसऱ्या दिवशी बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. मात्र डॉ. वाघ आणि डॉ. तासगावकर यांनी बालकाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यास उशीर केला. दुपारी एक वाजल्यापासून ४.३० वाजेपर्यंत डॉक्टरांकडून कागदपत्रे देण्यात आली नाहीत.
या साडेतीन तासांच्या काळात बालकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप दौलत शिंदे यांनी केला आहे. याबाबत ठाण्यातील शहर रूग्णालयाचे शल्य चिकित्सक रत्नाकर कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आरोग्य विभागाचे उपसंचालक संजीव कांबळे यांनी चौकशीचे आदेश दिले असल्याचे सांगितले.