प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण जाहीर करावे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या १८ बीएड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात सिनेट सदस्यही उतरणार आहेत.
या १८ महाविद्यालयांत नियमित व मान्यताप्राप्त शिक्षक नसल्याने विद्यापीठाने या महाविद्यालयातील वर्ष २०१२-१३ या शैक्षणिक सत्रातील विद्यार्थ्यांचे प्रात्याक्षिक गुण स्वीकारले नाही.
महाविद्यालयात एकही प्राध्यापक नसल्याचे प्रकरण वर्ष २०१३-१४ मधील आहे. तेव्हा वर्ष २०१२-१३ मधील विद्यार्थ्यांच्या प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण स्वीकारून ते जाहीर करावे, अशी मागणी सिनेट सदस्य अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी केली आहे.
२०११-२०१२ मध्येही नियमित प्राध्यापक नव्हते. तेव्हा या महाविद्यालयातील प्रात्याक्षिक परीक्षेचे गुण कसे काय स्वीकारले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, हे प्रकरण सिनेटच्या बैठकीतही उपस्थित करण्यात आले होते. परीक्षा मंडळाची बैठक बोलावून त्यात या समस्येवर मार्ग काढण्याचे आश्वासन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिले होते. याप्रकरणात कुलगुरू आणि प्र-कुलगुरूंनी या समस्येवर तोडगा काढला आहे. परंतु परीक्षा विभागाने त्यात पुन्हा अडसर निर्माण केल्याने हे प्रकरण प्रलंबित असल्याचे समजते.