जिल्हा सहकारी बँक कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल झालेले संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित, रमेश आडसकर, धर्यशील सोळंके या दिग्गजांसह ११ संचालकांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ११ नोव्हेंबपर्यंत अंतरिम जामीन दिला. प्रत्येकी दहा लाखांचा जातमुचलका व दोन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे. अटकेच्या भीतीने महिनाभरापासून फरारी असलेल्या या दिग्गजांना दिवाळीच्या सुटीतील न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने समर्थकांसह त्यांची दिवाळी तूर्त गोड झाली आहे.
जिल्हा बँक विनातारण, ५ संस्थांना नियमबाहय़ कर्ज मंजूरप्रकरणी ठपका ठेवून ३ ऑक्टोबरला बँकेच्या तत्कालीन २४ संचालकांवर बँकेचे प्रशासक अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या आदेशावरून शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. जवळपास ८० कोटींच्या कर्जप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अमरसिंह पंडित यांच्यासह संचालक असलेले राष्ट्रवादीचे माजी जि. प. उपाध्यक्ष रमेश आडसकर, माजी मंत्री प्रकाश सोळंके यांचे बंधू धर्यशील सोळंके, माजी अध्यक्ष सुभाष सारडा या दिग्गजांसह २४ संचालकांचा समावेश होता.
मात्र, अटकेच्या भीतीने सत्ताधारी पक्षाचे सर्वच दिग्गज जिल्हय़ाबाहेर होते. गुन्हा दाखल झालेल्या संचालकांनी सुरुवातीला जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर या संचालकांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. दरम्यान, न्यायालयात सुनावणी सुरू असल्याने मंगळवारी सुटीतील न्यायाधीश सुनील देशमुख यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने आ. पंडित यांच्यासह अकरा संचालकांना ११ नोव्हेंबपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला. प्रत्येकी १० लाख रुपयांचा जातमुचलका, तसेच ७ व ९ नोव्हेंबरला पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यासही बजावण्यात आले आहे.