पालिका कुंडय़ांचा आडोसा
ठाणे शहरात ठिकठिकाणी असणाऱ्या वाईन तसेच बीअर शॉपसमोरील जागेलाच तळीरामांनी दारू पिण्याचे अड्डे बनविल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसत आहे.  शहरातील सव्‍‌र्हिस रोड, हिरानंदानी मेडोज येथे दुकानांचे गाळे असलेला भाग, उपवन, घोडबंदर रोड येथील काही परिसर, ठाणे पूर्व येथील मीठबंदर रोड आदी ठिकाणी रात्री हे प्रकार सर्रास घडत असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांनाही हा प्रकार दिसत असून ते त्याकडे कानाडोळा करतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेले लुईसवाडी येथील काही नागरिक याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार आहेत.
लुईसवाडी येथील ‘श्रद्धा बीअर शॉप’ हे अशा प्रकारच्या अड्डय़ाचे उत्तम उदाहरण आहे. रात्रीच्या वेळी या दुकानाचा दर्शनीय भाग महापालिकेच्या कुंडय़ाने झाकण्यात येतो. दारूबरोबर खाण्यासाठी लागणारे पदार्थ या शॉपच्या मालकाकडून उपलब्ध करून दिले जात असल्याने खाद्यपदार्थाची पाकिटे आणि दारूच्या बाटल्यांचा येथे अनेकदा खच पडलेला असतो. शिवसेनेच्या स्थानिक आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे दुकान सुरू असल्याने अनेक वेळा तक्रारी करूनही या दुकानाविरोधात कोणतीही कारवाई केली जात नसल्याचे येथील एका रहिवाशाने सांगितले. याबाबत वागळे इस्टेट पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. डी. मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी तक्रार केल्यास या तळीरामांवर त्वरित कारवाई केली जाईल असे सांगितले.