News Flash

आधी गुन्हेगार, आता समाजरक्षक!

राज्यात कोठेही दरोडा पडला, की पोलीस उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पारधी पेढय़ांवर छापा टाकायचे. हे चित्र बदलण्यासाठी चंद्रकांत सावळे या पोलीस अधिकाऱ्याने प्रयत्न केले आणि अट्टल गुन्हेगारांकडे

| December 6, 2013 01:59 am

घरे गावकुसाबाहेर. बाजारपेठेत किंमत शून्य. भाळी गुन्हेगारीचा शिक्का. त्यामुळे पोलिसांचा सततचा पाठलाग. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यात पारधी समाजातील अशा १४ जणांपैकी काहींवर दरोडय़ाचा गुन्हा, तर काही जण चोऱ्या, वाटमाऱ्यांमध्ये अडकलेले. राज्यात कोठेही दरोडा पडला, की पोलीस उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पारधी पेढय़ांवर छापा टाकायचे. हे चित्र बदलण्यासाठी चंद्रकांत सावळे या पोलीस अधिकाऱ्याने प्रयत्न केले आणि अट्टल गुन्हेगारांकडे सुरक्षारक्षकाची जबाबदारी दिली. कळंब शहरात आता हे १४ जण गस्त घालतात..
कळंब तालुक्यात पारधी समाजाची संख्या जास्त. सगळे व्यवसाय पोलिसांपासून लपूनछपून करायचे. कायद्यापासून पळण्याची एवढी सवय, की पारधी समाजातील महिलांनाही कोणत्या कलमान्वये कोणती शिक्षा, हे तोंडपाठ आहे. कळंब तालुक्यातील ढोकी वस्तीवरील भारत राजाराम पवार हा पोलीस कोठडीतून पळून गेलेला गुन्हेगार. त्याच्यासारखेच शंकर राजेंद्र पवार, बबन शामराव काळे, शंकर बाबुशा पवार, रवींद्र शामराव काळे, लक्ष्मण भीमा काळे हे तसे भुरटय़ा चोरीतले आरोपी. विनोद रामराजे पवार, दिनेश चव्हाण, अशोक रामराजे पवार, हिरान बलभीम काळे, बप्पा सुभाष पवार, राहुल राजेंद्र पवार, सुधीर राम पवार, मुन्ना सुभाष पवार हे काही जण पोलीस निरीक्षक सावळे यांच्या संपर्कात आले. त्यातील काही जणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता यावे, या साठी सावळे यांनी प्रयत्न सुरू केले. हाताला काम दिले जात नाही, तोपर्यंत या गुन्हेगारांचे पुनर्वसन होणार नाही, असे लक्षात आल्यानंतर सावळे यांनी शहरातील गस्तीची जबाबदारी या १४ जणांवर देण्याचे ठरविले. हातात काठी आणि तोंडात शिट्टी देऊन त्यांना गस्तीवर पाठविले जाते. ‘पोलीस-नागरिक मित्र’ असे नाव या प्रकल्पाला देण्यात आले आहे.
कळंब शहरात कपडय़ाची मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे व्यापारी या तरुणांना कधी ५० तर कधी १०० रुपये देतात. व्यापारी आणि व्यावसायिकांकडून दर महिन्याला ठरावीक रक्कम मिळत असल्याने अनेक जण या व्यवसायात रमू लागले आहेत. माणूस म्हणून जगण्याची निर्माण करून दिलेली ही संधी जिल्ह्य़ात कौतुकाचा विषय ठरू लागली आहे. पोलीस निरीक्षक सावळे यांच्या उपक्रमाला पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचेही सहकार्य मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2013 1:59 am

Web Title: before criminal now social guard
टॅग : Theft,Usmanabad
Next Stories
1 जादूटोणाविरोधी विधेयक गरजेचेच – डॉ. शहापूरकर
2 मंत्री पाटील, खा. मुंडेंवर ढाकणे यांची टीका
3 वीजप्रश्नी शेतकरी रस्त्यावर
Just Now!
X