नवी मुंबईतील सर्व रेल्वे स्थानकांवर व रेल्वे डब्यांमध्ये भिकांऱ्याचे प्रमाण वाढत चालले असून रेल्वे स्थानकांमध्ये तासन्तास भिकारी आपले बस्तान मांडून बसत आहे. रेल्वे स्थानकांमधील वाढत्या गर्दीमुळे रेल्वे स्थानकांवर विश्रांतीसाठी बसवण्यात आलेल्या बाकडय़ांवर भिकाऱ्यांनी आपला कब्जा केला आहे. त्यामुळे चाकरमान्यांना रेल्वेची ताठकळत वाट बघत उभे राहवे लागत आहे. मागील काही दिवसांपासून नवी मुंबईतील सिडकोच्या वतीने बांधण्यात आलेल्या हायटेक रेल्वे स्टेशनमध्ये उघडय़ावर झोपणे, जेवण सुरू करणे असे प्रकार भिकांऱ्याकडून होत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकांमध्ये अस्वच्छता दिसून येत असून चाकरमान्यांनाही किळसवाणे वाटत आहे.
एखाद्या बाकडय़ावर बसणाऱ्या जोडप्याकडून भीक घेतल्याशिवाय भिकारी पुढेच जात नाही. त्यामुळे नाइलास्तव जोडप्यांना भीक देण्याची इच्छा नसतानादेखील भीक द्यावी लागत आहे. तसेच लोकलमधून लहान मुले भीक मागतानाही दिसत असून येणाऱ्या-जाणाऱ्या ट्रेनमध्ये दरवाजाजवळ उभ्या असणाऱ्या प्रवांशाकडून पैशाची मागणी करीत फलाटांवर रेल्वेच्या मागेही ही मुले धावतात. त्यामुळे छोटे-मोठय़ा अपघातांना निमंत्रणही मिळत आहे.   यामध्ये लहान मुलांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात असून हे भिकारी ट्रेनच्या शेवटच्या डब्याजवळ घोळक्याने बसलेले असतात. त्यामुळे महिलांना रेल्वे डब्यामध्ये चढ- उतार करतानादेखील यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच फलाटवर उभे असणाऱ्या रेल्वे प्रवाशांकडे लहान मुले वारंवार पैशांची मागणी करतात. जोपर्यंत पैसे देत नाहीत तोपर्यंत ते मागतच राहतात. तसेच पैसे न दिल्यास अश्लील शब्ददेखील बोलतात. पण समाजाच्या लाजेपोटी प्रवासीही त्याच्यांशी हुज्जत घालत बसत नाहीत. पण भिकारी मात्र त्याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसून येते.
सुरुवातीला भिकारी कमी प्रमाणात होते. मात्र आता भिकाऱ्यांचे प्रमाण वाढले असून सुरुवातीला लोकलमध्येच पसे मागायचे, पंरतु आता फलाटावर बाकडय़ावर बसल्यांनतरदेखील मागतात.
     अरुण सांळुखे, नागरिक.