जिल्हा परिषद गैरव्यवहारप्रकरण
                                                                                                                                                                                                                                                                                        
जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्यातील गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने आता अटक कधीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन आठ पैकी पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात कंत्राट वाटपात अनेक गैरव्यवहार झाल्याने निदर्शनास आले आहे. या सर्व गैरव्यवहाराची तक्रार सीईओ अरुण शिंदे यांनी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीच्या आधारावर अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू राजगडकर यांच्याकडे बांधकाम, सिंचन, कृषी, पशुसंवर्धन आणि समाजकल्याण हे पाच विभाग सोपवण्यात आले होते. या काळात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भूषण मून, लेखाधिकारी अरुण गर्गेलवार, टेंडर लिपिक प्रवीण दातारकर, प्रभाकर शेंभळकर, आर.एम.डाखरे, कुळमेळो व शंभरकर या आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या आठही जणांनी संगनमत करून आठ निविदांमध्ये गैरव्यवहार केला. त्यात गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास येताच मुख्य कार्यपालन अधिकारी अरुण शिंदे यांनी सोमवारी रात्री उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्याकडे फौजदारी तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीच्या आधारावर हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आता अटक कधीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. या पाच जणांना अटकपूर्व जामीन मिळतो का, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.