* पाच वर्षांत साडेतीन हजार चालकांचे प्रशिक्षण
* ‘बेस्ट’ उपक्रमाला १ कोटी १२ लाखांचे उत्पन्न
अवजड वाहने चालवण्याचा शिकाऊ परवाना आहे, पण वाहने चालवणे कुठे शिकायचे हे माहीत नाही, अशा परिस्थितीत अडकला असाल, तर ‘बेस्ट’ तुमची मदत करू शकेल. ‘बेस्ट’च्या दिंडोशी आगारात वाहतूक प्रशिक्षण केंद्र कार्यरत असून तेथे अवजड वाहने शिकण्याची आवड असलेल्यांना ‘बेस्ट’च्या अनुभवी चालकांकडून वाहन चालनाचे धडे दिले जातात. नोव्हेंबर २००८ पासून हे केंद्र कार्यरत असून आतापर्यंत ३३६५ लोकांनी येथून प्रशिक्षण घेतले आहे. कौतुकाची बाब म्हणजे यापैकी २२९६ चालकांना ‘बेस्ट’नेच आपल्या सेवेत सामावून घेतले. वर या उपक्रमातून ‘बेस्ट’ला १ कोटी १२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
मुंबई शहरात व उपनगरांत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक ‘स्कूल’ आहेत. या केंद्रांमध्ये अवजड वाहने चालवण्याचा शिकाऊ परवाना काढून दिला जातो. मात्र यापैकी बहुतांश केंद्रांना अवजड वाहने विकत घेणे आणि त्यांची देखभाल करणे याचा खर्च परवडत नाही. त्यामुळे अवजड वाहने चालवण्याचा शिकाऊ परवाना असूनही चालकांना सराव करता येत नाही. अशा नवख्या चालकांसाठी ‘बेस्ट’ने २००८मध्ये हे केंद्र दिंडोशी आगार येथे सुरू केल्याची माहिती सहाय्यक जनसंपर्क अधिकारी ज्ञानदेव खरात यांनी दिली.
या केंद्रात शिकाऊ चालकांना ‘बेस्ट’च्या तज्ज्ञ तसेच ज्येष्ठ चालकांकडून अवजड वाहने चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाचा कालावधी २१ दिवसांचा त्यासाठी ५२५० रुपये शुल्क आकारले जाते. या केंद्रात आम्ही केवळ वाहन चालवण्याचेच नाही, तर वाहतुकीचे नियम, वाहतूक सिग्नल, रस्त्यावरील खुणा यांचीही माहिती चालकांना देतो. त्याशिवाय वाहनाची संपूर्ण माहिती ‘बेस्ट’च्या अभियंत्यांद्वारे दिली जाते. वाहन चालवताना येणारा ताण दूर करण्यासाठी योगासने, तणावमुक्ती आदी विषयांवरही आम्ही कार्यशाळा आयोजित करतो, असे खरात यांनी सांगितले. ‘बेस्ट’ला या उपक्रमातून गेल्या पाच वर्षांत १ कोटी १२ लाख २७५ रुपये एवढे उत्पन्न मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली.
‘बेस्ट’ने प्रशिक्षण दिलेल्या ३३६५ चालकांपैकी २२९६ चालकांची चाचणी घेऊन त्यांना ‘बेस्ट’ उपक्रमात सामावूनही घेण्यात आले आहे. हे चालक ‘बेस्ट’च्या मुशीतून तयार झालेले असतात. त्यांना आमचे नियम आणि आमची कार्यपद्धती यांची माहिती असते. त्यामुळे ‘बेस्ट’च्या सेवेत रुजू होताना त्यांना कोणतीही अडचण येत नाही, असे खरात यांनी सांगितले.