एकीकडे एसटीने सुरू केलेली ‘इंट्रासिटी शिवनेरी सेवा’ अडखळत सुरू असताना दुसऱ्या बाजूला ‘बेस्ट’ने पूर्व मुक्तमार्गावर सुरू केलेल्या दोन नव्या सेवा फायद्यात धावत आहेत. १४ किलोमीटर विनाथांबा प्रवास, इंधनाची आणि वेळेची बचत आणि योग्य मार्गाची आखणी या त्रिवेणी संगमामुळे ‘बेस्ट’च्या या नव्या सेवांना प्रवाशांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. साधारणपणे दोन ते अडीच तासांच्या या प्रवासातील तब्बल एक तास पूर्व मुक्तमार्गामुळे वाचत असल्याने प्रवासी या सेवेवर बेहद्द खुश आहेत.
पूर्व मुक्तमार्ग सुरू झाल्यावर ‘बेस्ट’ने या मार्गावरून दोन गाडय़ा सुरू केल्या. मंत्रालय ते शिवाजीनगर ही ‘सी-८’ क्रमांकाची आणि ‘सी-५०’ ही जागतिक व्यापार केंद्र ते वाशी बस स्थानक अशा दोन गाडय़ा १ जुलैपासून सुरू झाल्या. या दोन गाडय़ांच्या प्रत्येकी चार फेऱ्या दिवसभरात होतात. यातील दोन फेऱ्या शिवाजीनगर व वाशी येथून सकाळी आणि दोन फेऱ्या मंत्रालय आणि जागतिक व्यापार केंद्र येथून संध्याकाळी निघतात. शिवाजीनगरहून सुटणाऱ्या दोन फेऱ्या सकाळी ८.३० व ९.०० वाजता सुटतात तर याच मार्गावर मंत्रालयाजवळून सुटणाऱ्या गाडय़ा संध्याकाळी ५.३० व ६.०० वाजता निघतात. वाशीहून सकाळी ८.३० व ९.०० वाजता दोन गाडय़ा निघतात. तर परतीच्या गाडय़ा सायंकाळी जागतिक व्यापार केंद्राजवळून ५.४५ आणि ६.१५ वाजता सुटतात.
या मार्गावर ‘बेस्ट’ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मंत्रालय ते शिवाजीनगर या गाडीच्या चार फेऱ्या मिळून दर दिवशी सरासरी २३३ प्रवासी या बसने प्रवास करतात. तर जागतिक व्यापार केंद्र ते वाशी या गाडीला दर दिवशी सरासरी १८३ प्रवासी लाभले आहेत. या दोन्ही मार्गावरील तब्बल १४ किलोमीटरचा प्रवास विनाथांबा असल्याने वाशी, शिवाजीनगर येथील प्रवासी इतर सेवांच्या तुलनेत या नव्या सेवेला प्रतिसाद देत आहेत. तसेच या दोन्ही सेवांचे तिकीट दरही जास्तीत जास्त अनुक्रमे २९ आणि ३४ रुपये इतके अत्यल्प आहेत, असे बेस्टचे जनसंपर्क अधिकारी वीरेंद्र बागुल यांनी सांगितले.

मंत्रालय ते शिवाजीनगर (सी-८)
बस मार्ग : मंत्रालय-हुतात्मा चौक-छत्रपती शिवाजी टर्मिनस-महात्मा फुले मंडई-कर्नाक बंदर-वाडीबंदर-पूर्व मुक्तमार्ग-पांजरपोळ-मैत्री पार्क-चेंबूर-शिवाजीनगर
अंतर : २६.८ किमी
तिकीट शुल्क : किमान ७ रुपये आणि कमाल २९ रुपये
सरासरी प्रवासी : २३३
सरासरी प्रतिदिन उत्पन्न : २७७५/-

जागतिक व्यापार केंद्र ते वाशी
बस मार्ग : जागतिक व्यापार केंद्र-चर्चगेट-हुतात्मा चौक-जनरल पोस्ट ऑफिस-पी. डिमेलो मार्ग-कारनॅक बंदर-वाडीबंदर-पूर्व मुक्तमार्ग-पांजरपोळ-देवनार डेपो-मानखुर्द-वाशी बस स्थानक.
अंतर : ३१.५ किमी
तिकीट शुल्क : किमान ७ रुपये आणि कमाल ३४ रुपये
सरासरी प्रवासी : १८३
सरासरी प्रतिदिन उत्पन्न : २७०४/-