इमारत पडली..रहिवासी दुसरीकडे पांगले.. जवळपास १४ वर्षे उलटली आणि अचानक त्या रहिवाशांच्या नावाने दणदणीत वीजबिल येऊन थडकले. ही करामत केली आहे ती मुंबईत दर्जेदार वीजपुरवठय़ासाठी आम्हीच ‘बेस्ट’ असल्याची टिमकी वाजवणाऱ्या ‘बेस्ट उपक्रमा’ने. तीही एकाच्या बाबतीत नाही तर चार जणांच्या बाबतीत.
दादर पूर्वेला हिंदू कॉलनीत गुरूकृपा सोसायटी आहे. १४ वर्षांपूर्वी, १९९९ च्या सुमारास या इमारतीचा पुनर्विकास झाला. त्यासाठी साहजिकच इमारत पाडण्यात आली. इमारत पाडताना नियमाप्रमाणे रहिवाशांनी आपापले वीजमीटर ‘बेस्ट’कडे जमा केले. त्यानंतर काही रहिवासी पुन्हा राहायला आले तर काही पांगले..दुसरीकडे राहायला गेले. वर्षांमागून वर्षे उलटली आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वीजबिले आली तेव्हा ‘बेस्ट’च्या करामती पाहून रहिवासी चक्रावले.
इमारत पडल्यानंतर पुन्हा राहायला आलेल्यांपैकी तरुलता सुळे या एक. यंदा त्यांना त्यांच्या राहत्या घराचे वीजबिल मिळालेच, पण ‘बेस्ट’ उदार झाली आणि १४ वर्षांपूर्वी बंद झालेल्या पहिल्या मजल्यावरील घराचे १३९० रुपयांचे वीजजोडणीचे आणखी एक बिल त्यांच्या हातात पडले. काहीही कारण नसताना नसती डोकेदुखी त्यांच्या मागे लागली.
एवढय़ावरच ‘बेस्ट’चा ढिसाळ कारभार थांबलेला नाही. इमारत पडल्यावर दुसरीकडे निघून गेलेल्या मालती माजरीकर, टीव्हीआर वारियार आणि एम. शर्मा या तिघांच्या नावाने अचानक १४ वर्षांनी पुन्हा एकदा वीजबिल आले. वारियार यांच्या नावाने २२३० रुपयांचे तर शर्मा यांच्या नावाने तब्बल १२,७७० रुपयांचे वीजबिल आले आहे. रहिवाशांसाठी हा करमणुकीचा विषय झाला असला तरी ‘बेस्ट’च्या कारभाराची लक्तरे यामुळे उघडय़ावर पडली आहेत.