बेस्टने दोन महिन्यांच्या अंतराने १ एप्रिलपासून दुसऱ्यांदा केलेल्या बस भाडेवाढीमुळे महसुलात प्रतिदिन सुमारे आठ ते दहा लाख रुपयांनी वाढ झाली असून बेस्टच्या तिजोरीत अतिरिक्त महसूल पडू लागला आहे. असे असले तरी कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी अन्य पर्याय निवडण्यास सुरुवात केल्याने बेस्ट अधिकारी चिंतित झाले आहेत. महिन्याभराच्या अंतराने दुसऱ्यांदा केलेल्या या भाडेवाढीमुळे सुमारे दहा लाख प्रवाशांनी बेस्टच्या बसकडे पाठ फिरविली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने अनेक मुंबईकरांनी गावची वाट धरली आहे. जूनमध्येच प्रवाशांची संख्या कमी होते की वाढते हे स्पष्ट होईल, असा दावा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाने डळमळीत झालेला आर्थिक डोलारा सावरण्यासाठी फेब्रुवारीमध्ये बस भाडेवाढ करून थेट मुंबईकरांच्या खिशात हात घातला. त्यानंतर आता १ एप्रिलपासून दुसऱ्यांदा भाडेवाढ केली. या भाडेवाढीमुळे मिळणारा महसूल पाहता तोटय़ाच्या गर्तेत रुतलेले बेस्टचे चाक किंचितसे हलले आहे. पण प्रवाशी संख्या घटण्याचे प्रमाण मात्र लक्षणीय आहे.
१ एप्रिलपासून बेस्टने किमान भाडे २ रुपयांनी वाढविले असून दोन किलोमीटर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता आठ रुपये मोजावे लागत आहेत. प्रवाशांना आठ ते दहा रुपयांमध्ये अनेक ठिकाणी शेअर टॅक्सी अथवा रिक्षाचे पर्याय उपलब्ध आहे. पूर्वी बेस्टचे किमान भाडे सहा रुपये होते, तेव्हा प्रवाशी हा पर्याय स्वीकारताना दिसत नव्हते. पण आता किमान भाडे आठ रुपये झाल्यामुळे झटकन मिळणारी शेअर टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडू लागले आहेत. बेस्ट उपक्रमासाठी ही बाब चिंतेची बनत चालली आहे.
बेस्टने १ एप्रिलपासून केलेल्या भाडेवाढीमुळे उपक्रमाच्या तिजोरीत दर दिवशी सुमारे आठ ते दहा लाख रुपये अतिरिक्त उत्पन्न पडू लागले आहे. मार्चमध्ये बेस्टला प्रवाशांकडून दर दिवशी पावणेतीन कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. आता ते दोन कोटी ८५ लाखांच्या घरात गेले आहे. मार्चमध्ये सुमारे ४० लाख प्रवाशी बेस्टच्या बसमधून प्रवास करीत होते. मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशी संख्या १० लाकांनी घटली असून बेस्टची प्रवासी संख्या ३० लाख झाली आहे. किमान अंतरासाठी प्रवास करणाऱ्यांनी मोठय़ा संख्येने बेस्टच्या बसकडे पाठ फिरविल्यामुळे ही घसरण झाली आहे, असे बेस्टच्या परिवहन विभागातील अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
सध्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. काही मुंबईकरांना गावची वाट धरली आहे, तर काही पर्यटनासाठी मुंबईबाहेर गेले आहेत. त्यामुळे आताच बेस्टच्या प्रवाशांची संख्या आणि दर दिवशीचे उत्पन्न याबाबत बोलणे योग्य नाही. जूनमध्ये शाळा-महाविद्यालये सुरू होतील. त्यानंतर बेस्ट बसमधून किती प्रवाशी प्रवास करतात हे स्पष्ट होईल. आताची दर दिवशीची प्रवाशी घट त्यावेळी भरून निघेल, असा आशावाद या अधिकाऱ्याने व्यक्त केला.