मुंबईत राहत असाल आणि बेस्टची वीज वापरत असाल, तर या महिन्यात सरासरी बिल आणि पुढील महिन्यात अचानक जास्त रकमेचे बिल, या परिस्थितीसाठी तयार राहा! बेस्टच्या वीज बिलासंबंधीची संगणकात साठवलेली सर्व माहिती पुसली गेल्याने या महिन्याचे वीज बिल सरासरी रकमेचेच येणार असल्याची माहिती बेस्ट समितीच्या बैठकीत प्रशासनातर्फे देण्यात आली. विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांतील ‘सरासरी बिला’चा हा दुसरा फेरा आहे. याबाबत समिती सदस्यांनी बेस्ट प्रशासनावर कडाडून टीका केली.
बेस्टच्या वीज ग्राहकांच्या वीज वापराची सर्व माहिती संगणकावर साठवली जाते. मात्र या महिन्यात ही सर्व माहिती संगणकावरून पुसली गेली आहे. पर्यायाने अनेक विभागांमध्ये ग्राहकांना उशिरा वीज बिल मिळत आहे. मात्र बिलाचे मासिक चक्र चुकू नये, यासाठी बेस्ट आता सरासरी रकमेचे बिल ग्राहकांना पाठवणार आहे. संगणकावरून पुसली गेलेली माहिती परत मिळवण्याचे काम सुरू आहे. हे काम झाल्यावर ग्राहकांच्या या महिन्यातील वीज वापराचा नेमका आकडा बेस्टला मिळणार आहे. त्यानुसार पुढील महिन्याच्या बिलात ही रक्कम जोडली जाईल. त्यामुळे पुढील महिन्यातील बेस्टचे विजेचे बिल जास्त येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
या गोंधळाबाबत प्रशासनावर ताशेरे ओढताना समिती सदस्य केदार होंबाळकर यांनी या प्रणालीबद्दलच शंका उपस्थित केली. ‘सॅप’ तंत्रज्ञान बेस्टने आपल्या कार्यकक्षेत आणले, तेव्हाच ते जुने झाले होते. कोणतेही तंत्रज्ञान सातत्याने अद्ययावत करावे लागते. मात्र बेस्टने ती तसदी घेतलेली नाही. बेस्टकडे हे तंत्रज्ञान हाताळणारे कुशल मनुष्यबळ नसल्याने आजही ही प्रणाली संबंधित कंपनीकडूनच हाताळली जात आहे. हा खूप मोठा गोंधळ असल्याची टीका होंबाळकर यांनी केली.
याआधी नोव्हेंबर महिन्यात बेस्टच्या सव्‍‌र्हरमध्ये बिघाड झाल्याने बेस्टच्या वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप झाला होता. अनेकांना दोन-तीन महिन्यांची बिले एकदम भरावी लागली होती. या वेळी तो मनस्ताप टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने किमान वीज ग्राहकांना या बिघाडाबाबत माहिती द्यायला हवी, अशी सूचना समिती सदस्यांनी बैठकीत केली.