इंधन दरवाढ, घटती प्रवासी संख्या यांमुळे तोटय़ात चाललेल्या ‘बेस्ट’ उपक्रमाच्या वाहतूक विभागाच्या तिजोरीला आणखी एक सरकारी ‘छिद्र’ही पडले आहे. ‘बेस्ट’ उपक्रमाकडून सरकार प्रवासी कर आणि पोषणमूल्ये कर असे दोन कर वसूल करत असून, गेल्या दहा वर्षांतील या करांचे एकत्रित मूल्य ५२० कोटी एवढे झाले आहे. सरकारने ‘बेस्ट’ला या दोन घटकांमध्ये करमाफी दिल्यास ‘बेस्ट’चा तोटा काही प्रमाणात भरून निघणार असल्याने अशी मागणी ‘बेस्ट’ने सरकारदरबारी केली आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्र्यांकडून कोणताही निर्णय अद्याप तरी झालेला नाही.
काय आहे प्रवासी कर?
राज्य सरकारने १५ सप्टेंबर १९६६ पासून ‘बेस्ट’ उपक्रमाकडून तिकीट मूल्याच्या ५ टक्के दराने कर वसूल करण्यास सुरुवात केली. या कराला प्रवासी कर असे संबोधण्यात आले. दहा वर्षांनंतर ७ मे १९७६ रोजी हा कर ३.५ टक्के करण्यात आला. म्हणजेच या करात १.५ टक्क्य़ांची घट करण्यात आली. मात्र त्या वेळेपासून आजतागायत गेली ३७ वर्षे हा कर नेमाने घेतला जातो. गेल्या दहा वर्षांत प्रवासी करापोटी ३११ कोटी रुपयांची रक्कम ‘बेस्ट’ने सरकारी तिजोरीत जमा केली आहे. यातील ४५ कोटी रुपये तर एकटय़ा २०१२-१३ या आर्थिक वर्षांत देण्यात आले.
पोषणमूल्ये कराचा इतिहास
पोषणमूल्ये कराचा इतिहास हा १९७१च्या युद्धापासून सुरू होतो. १९७१मध्ये भारताच्या पूर्व सीमेवर झालेल्या या युद्धाच्या काळात देशभरातील नागरी परिवहन सेवांवर कर आकारण्यात आला. त्या वेळी या कराला बांगलादेश निर्वासित कर असे नाव दिले गेले होते. १५ डिसेंबर १९७१ रोजी सुरू करण्यात आलेल्या या करात दर ४५ पैशांच्या तिकिटावर ५ पैसे अशी ही आकारणी होती. मात्र हा कर १ मार्च १९७३ रोजी बंद करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने मात्र १ एप्रिल १९७४ पासून हा पोषण अधिभार घेण्यास सुरुवात केली. त्या वेळी दर ४५ पैशांमागे ५ पैसे अशीच ही कर आकारणी होती. मात्र पुढील काळात ही आकारणी दोन रुपयांच्या तिकिटामागे १५ पैसे अशी करण्यात आली. ही कर आकारणी अद्यापही चालू आहे.
करमाफी दिल्यास ‘बेस्ट’ला फायदा काय?
राज्य सरकारने प्रवासी आणि पोषण अधिभार या दोन्ही प्रकारचे कर ‘बेस्ट’साठी माफ केले, तर वार्षिक ५० ते ५५ कोटी रुपयांचा निधी ‘बेस्ट’ उपक्रमाला उपलब्ध होईल. हा निधी प्रवाशांच्या सुविधेसाठी किंवा विविध लोकोपयोगी उपक्रमांसाठी खर्च करता येणार आहे. आगारांतील सुविधा सुधारणे, बस स्टॉप नूतनीकरण करणे, नवीन बस खरेदी करणे, बसमधील सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे यासाठी या निधीचा विनियोग करता येणार आहे.
सद्य:स्थिती
प्रवासी कर आणि पोषण अधिभार ‘बेस्ट’साठी माफ करावा, अशी रीतसर मागणी ‘बेस्ट’ने राज्य सरकारला केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भर देण्याचे आवाहन करत एसटीच्या कॉर्पोरेट शिवनेरीचे उद्घाटन केल्यानंतर ‘बेस्ट’च्या या मागणीला जोर आला होता. मात्र या मागणीची कागदपत्रे संबंधित विभागांकडून मुख्यमंत्र्यांकडे गेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसला, तरी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत, असे ‘बेस्ट’मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रवासी व पोषण अधिभाराची रक्कम (कोटींमध्ये)
वर्ष           प्रवासी अधिभार    पोषण अधिभार     एकूण
०३-०४                 २५.३८    २२.५२          ४७.९०
०४-०५                 २६.५९    २८.१४           ५४.७३
०५-०६                 २७.६७    २१.१७           ४८.८४
०६-०७                 २७.६८    २१.०४           ४८.७२
०७-०८                 २७.६३    २०.८४           ४८.४७
०८-०९                  २९.००     १९.५६           ४८.५६
०९-१०                  २९.८४     १९.०९            ४८.९३
१०-११                  ३५.२१     १८.७२           ५३.९३
११-१२                  ३६.८५     १७.७९          ५४.६४
१२-१३                  ४५.३२    १७.५१           ६२.८३
एकूण               ३११.१७       २०६.३८         ५१७.५५